लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधान परिषद सभागृहात मोबाइलवर पत्ते खेळल्याने आणि वादग्रस्त विधाने केल्याने मंत्रिपद जाण्याची वेळ आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर्त अभय दिले आहे. मात्र, यापुढे वागण्या-बोलण्याबाबत एकही चूक केली तरी घरी जावे लागेल, असा सज्जड दमही त्यांनी कोकाटे यांना दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीला हजर होते. त्या आधी अजित पवार गटाच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट झाली. तेव्हा कोकाटे हे पवार यांच्या दालनात होते. यावेळी पवार यांनी कोकाटे यांना त्यांच्या अँटिचेम्बरमध्ये बोलविले आणि दहा मिनिटे त्यांचा क्लास घेतला.
सूत्रांनी सांगितले की, वादग्रस्त विधाने, पत्ते खेळणे असले प्रकार एका मंत्र्याला शोभणारे नाहीत. एकदा, दोनदा सांगूनही तुम्ही बडबड सुरूच ठेवली आहे, हे बरोबर नाही. मी, सुनील तटकरे यांनी सांगूनही तुम्ही ऐकत नाही याचा अर्थ तुम्हाला पक्षनेतृत्वाचाही धाक नाही, असा त्याचा अर्थ होतो, अशा कडक शब्दांत पवार यांनी त्यांची कानउघाडणी केली.
‘झाले ते खूप झाले...’
झाले ते खूप झाले. खरेतर तुमचे मंत्रिपदच काढायला हवे; पण आपले ज्येष्ठत्व लक्षात घेऊन आणि यापुढे आपण कुठलेही गैरवर्तन करणार नाही, या अटीवर तुम्हाला तूर्त मंत्रिपदी ठेवतोय. दर आठ-पंधरा दिवसांनी मला तुमच्या वागण्या-बोलण्यावर नजर ठेवावी लागेल आणि काही चुकीचे आढळले तर मंत्रिपद काढावे लागेल, असेही पवार यांनी कोकाटेंना बजावल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
‘त्यांनी चुका करत राहायच्या आणि...’
तत्पूर्वी शेतकरी संघटनांचे काही पदाधिकारी सकाळी अजित पवार यांना भेटले आणि कोकाटे यांना मंत्रिपदावरून हटवू नये, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर, ‘माणिकरावांनी चुका करत राहायच्या आणि मी अभय देत राहायचे का?’ असा सवाल अजित पवार यांनी केला.
कोकाटेंचा बोलण्यास नकार
अजित पवार गटाच्या मंत्रालयासमोरील कार्यालयात काही पक्षप्रवेश दुपारी होते. त्याला अजित पवार उपस्थित राहणार होते; पण ते आले नाहीत. कोकाटे यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला असता तर ते तसे सांगण्यासाठी माध्यमांसमोर गेले असते. ते माध्यमांशी न बोलल्याने कोकाटे यांना तूर्त अभय देण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याचे स्पष्ट झाले. या पक्षप्रवेशावेळी मंत्री हसन मुश्रीफ, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ उपस्थित होते. कोकाटे यांनी यावेळी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. कोकाटे यांनी अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्यात तसे आपल्या हातून घडणार नाही, याची हमी दिल्याची माहिती आहे.