Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमान, हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड झाल्यास आम्ही समजून जातो की...; अजित पवारांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 16:15 IST

अजित पवार गटाकडून आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून मुंबईत भव्य नारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मुंबई: आम्ही जेव्हा जेव्हा सत्तेत आलो तेव्हा तेव्हा महिला सशक्तीकरणासाठी भरीव काम केलं आहे. एखादे महिला धोरण राबवत असताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची आम्ही काळजी घेतो. कारण प्रत्येक विभागातील महिलांची परिस्थिती वेगळी आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार गटाकडून आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून मुंबईत भव्य नारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार बोलत होते.

गडचिरोली इथल्या दुर्गम भागातील मुली देखील व्होल्वोसारख्या गाड्या मोठ्या कौशल्यानं चालवताना मला दिसतात. अशा स्त्रियांचं मला कौतुक वाटतं. पाच राज्यात जे निकाल लागले, त्याठिकाणी भाजप सत्तेत येण्याचं कारण तिथे महिलांनी उस्फुर्तपणे भाजपाला पाठींबा दिला, असं अजित पवार म्हणाले. येत्या काळात लोकसभा आणि विधानसभेत मोठ्या प्रमाणात महिला सदस्य काम करताना आपल्याला दिसणार आहेत, असं अजित पवारांनी सांगितले. 

महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आम्ही ठरवला आहे. तशा पद्धतीनं आपलं काम चाललं आहे. हे काम करतानाच महिलांना मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सातत्यानं केलं आहे. उत्तम पद्धतीनं काम करणं महिलांच्या अंगीभूत आहे. त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात महिला आज पुरुषांच्या बरोबरीनं काम करत आहेत. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं त्यांना चांगलंच माहित आहे. ज्यावेळेस आम्ही हेलिकॉप्टरनं, विमानानं दौऱ्यावर जातो तेव्हा आपलं विमान किंवा हेलिकॉप्टर जर व्यवस्थित लँड झालं तर आम्ही समजून जातो, पायलट महिला आहे, असं अजित पवार म्हणाले.

रोजगाराच्या निमित्तानं बरेच लोक आम्हाला भेटतात. रोजगाराला चालना देण्यासाठी आम्ही प्रकल्प हाती घेतले आहेत. नवीन तरुणींना पुढे घेऊन जात महाराष्ट्रातील महिला भगिनींना सर्व स्तरावर योग्य तो न्याय देण्याचं काम आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करायचं आहे. राज्यातील स्त्री शक्तीनं कला, क्रीडा, उद्योग, व्यापार, शिक्षण, संशोधन, संरक्षण यांसारख्या क्षेत्रात आपल्या कामानं मानाचा ठसा उमटवण्याचं काम केलं आहे. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. लोकसभेच्या निवडणुका आपण सर्वच लढवणार आहोत. जागा कशा वाटप करायच्या तो निर्णय लवकरच घेऊ. पण आपण आताच कामाला लागा, असं निर्देशही अजित पवारांनी दिले. 

अजित पवार नेमकं काय म्हणाले, पाहा संपूर्ण व्हिडीओ-

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहिला