Join us

"जरांगेंची मागणी अविवेकी अन् अतिरेकी"; उपराकार लक्ष्मण मानेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 18:11 IST

ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी चुकीची असल्याचे सांगत, ओबीसी नेत्यांनी त्या मागणीविरुद्ध एल्गार मोर्चाला सुरुवात केली आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकीकडे सरकारी यंत्रणांच्या हालचाली वाढल्या असताना दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. जरांगेची रॅली आज पुण्यात पोहोचली असून पुण्यनगरीत त्यांच्या स्वागताला मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. एक मराठा, लाख मराठा... जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है... अशा घोषणांनी पुण्यातील रस्ते दणाणून गेले आहेत. तर, जरांगे पाटील हेही आपल्या आंदोलनावर ठाम असून २६ जानेवारीपासून ते मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. मात्र, जरांगेंच्या मागणीवरुन त्यांच्यावर टीका होत आहे. 

ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी चुकीची असल्याचे सांगत, ओबीसी नेत्यांनी त्या मागणीविरुद्ध एल्गार मोर्चाला सुरुवात केली आहे. तर, कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. ओबीसी नेत्यांनी जरांगेंच्या मागणीला स्पष्टपणे विरोध केला आहे. आता, उपराकार लक्ष्मण माने यांनीही जरांगेंची मागणी अविवेकी अन् अतिरेकी असल्याचं म्हटलं आहे. 

''तुम्ही जे न्यायाचं असेल ते मागा, तुमची मागणी अविवेकी आणि अतिरेकी आहे. तुम्हाला न्याय पाहिजे, तर न्यायासाठी संघर्ष करा, मग तुमच्यासोबत आम्ही लढायला तयार आहोत. पण, तुमची मागणी अनैतिक आहे, तुम्ही खालच्यांच्या ताटात बसत आहात, वरच्यांच्या नाही,'' असे म्हणत उपराकार लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध केला आहे. 

मोठी घोडी बारक्या घोड्यांना खाऊ देणार नाहीत, लाथा मारतील, शाहू महाराजांनीच हे सांगितलंय. तुमची घोडी मोठी आहे, बलवान आहे. परिस्थितीनं तुम्ही आमच्यासारखे झाला असाल तर तुम्हालाही आरक्षण द्या, पण ते स्वतंत्र असायला हवं. तुमची जागा स्वतंत्र ठेवा, आमची स्वतंत्र ठेवा. कारण, तुमची घोडी आमच्या घोड्यात आली तर आम्ही लाथाच खाऊ, असे म्हणत लक्ष्मण माने यांनी जरांगेची मागणी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. 

शाहू महाराज त्यांना आरक्षण देत होते, तेव्हा त्यांनी मिशा पिळल्या, ते क्षत्रीय झाले. बाबासाहेबांनी जेव्हा आरक्षण देतो म्हटले, तेव्हाही त्यांनी मिशा पिळल्या. मिशा पिळल्या याचा अर्थ, वरिष्ठ, उच्चवर्णीय असल्याने आम्ही आरक्षण घेऊ का हा मनुवादी विचार डोक्यात होता. मात्र, पंजाबराव देशमुखांनी तो विचार काढून टाकला, त्यामुळे विदर्भातील कुणब्यांना सवलती मिळाल्या, आणि कोकणातील कुणब्यांनाही सवलती मिळाल्या. पण, मराठवाड्यातील कुणब्यांना मिळाल्या नाहीत, कारण त्यांनी त्या नाकारल्या. त्यावेळी, तुम्ही त्या सवलती नाकारल्या आणि आता तुम्हाला पाहिजेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घ्या, पण आमच्याच ताटात बसतो आणि आमचंच खातो, हा आमच्यावर अन्याय नाही का?, असा सवालही लक्ष्मण माने यांनी जरांगेंना केला आहे.

५४ लाख मराठे व सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या

राज्यात कुणबी नोंदी सापडलेल्या ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्यांच्या रक्तनात्यातील नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र वाटावे तरच मराठा आरक्षणाचा हा आकडा वाढणार आहे. प्रमाणपत्रच वाटप झाले नाही तर अध्यादेशातील बदलांना अर्थच राहणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली होती. त्यातच, सगेसोयरे या शब्दावरही ते ठाम आहेत. त्यावरुन, त्यांच्यावर हेकेखोरपणा आणि कायदेशीर बाबींना जुमानत नसल्याची टीका होत आहे. याच अनुषंगाने जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सगसोयरे हा शब्द कायद्याच्या तरतूदीत बसत नाही, याशिवाय तुम्ही सातत्याने मागण्या बदलत आहात, असे जरांगेंना विचारले असता हा शब्द आम्ही दिला नसून दोन न्यायाधीशांनी दिलेला आहे, असे जरांगे यांनी सांगितले.   

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणलक्ष्मण मानेआरक्षण