Join us

गुन्हा रद्द करण्यासाठी एक कोटीची मागणी; महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:19 IST

तक्रारदार एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर आहे. त्याने त्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला बोरीवली पोलिसांनी अटक केली होती.

मुंबई : बोरीवली पोलिसांत दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी महिलेने मागितल्याचा आरोप ४० वर्षीय व्यक्तीने केला आहे. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांत महिलेसह तिचे दोन साथीदार आणि बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर आहे. त्याने त्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला बोरीवली पोलिसांनी अटक केली होती. तक्रारीनुसार, त्या महिलेने तक्रारदाराच्या जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी तसेच त्यानंतर संबंधित गुन्हा रद्द करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे कबूल केले.

मात्र, त्यासाठी त्याच्या बहिणीला २२ नोव्हेंबरला फोन करून करार करण्याची मागणी केली. तक्रारदार जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडे ती एक कोटी रुपये प्रत्यक्ष आणि व्हाॅट्सॲप  मेसेजद्वारे मागत होती.  संबंधित महिलेने तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीचा बँक खात्याची गोपनीय माहिती मिळविली असून, त्यासाठी तिला बँकेतील कर्मचारी मदत करत असल्याचाही तिच्यावर आरोप आहे. 

बँक खात्याची मिळविली माहिती -    पैशासाठी लॉकअपच्या फोटोसह धमकीचे मेसेजही तिने आपल्याला पाठविल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. -    याप्रकरणी चारकोप पोलिसांत तक्रार दिल्यावर महिला, तिचे दोन साथीदार आणि एका नामांकित बँकेचे संबंधित कर्मचारी यांच्याविरोधात चारकोप पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम ३०८(७), ६२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) (डी) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीभ्रष्टाचारलाचलुचपत प्रतिबंधक विभाग