Join us

राज्य सरकारच्या सेवेतील प्रति नियुक्तीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत रुजू करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:12 IST

सध्या राज्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असून मोठ्या प्रमाणात डॉक्टराची आवश्यकता आहे.

मुंबई  : राज्यात कोरोना मुळे वैद्यकीय आपत्कालीन सुरु असल्याने मंत्री आणि राज्यमंत्री तसेच अन्य ठिकाणी वैद्यकीय अधिकारी/ डॉक्टर असलेले अधिकारी प्रतिनियुक्तीवर किंवा अन्य नियुक्तीवर आहेत त्यांना तत्काळ वैद्यकीय सेवेत रुजू करुन वैद्यकीय सेवेमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल,  सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. 

सध्या राज्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असून मोठ्या प्रमाणात डॉक्टराची आवश्यकता आहे. अनेक आरोग्य संस्थांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय रुग्णालये, उपकेंद्रे, जिल्हा सामान्य रुग्णालये यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. कोरोना विषाणू मुळे होणाऱ्या आजाराने मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्त हानी होऊ शकते असे आज एकंदरीत जागतिक परिस्थितीवरून लक्षात येत आहे. या सर्व बाबींमुळे जनतेच्या मनात भय आणि चिंता निर्माण झाली आहे. असे असताना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स मंत्रालयात मंत्री, राज्यमंत्री यांचेकडे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा परिस्थितीत जे डॉक्टर आपले मूळ कर्तव्ये सोडून आज विविध ठिकाणी कार्यरत आहे. मंत्री आणि राज्यमंत्री तसेच अन्य ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर असलेले अधिकारी प्रतिनियुक्तीवर किंवा अन्य नियुक्तीवर आहेत त्यास त्या कर्तव्यातून मुक्त करत तत्काळ वैद्यकीय सेवेत रुजू करण्याची कार्यवाही आवश्यक आहे जेणेकरुन त्यांच्या अनुभवाचा आणि सेवेचा लाभ अश्या आपत्कालीन परिस्थितीत मिळू शकतो, असे गलगली म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमहाराष्ट्र सरकार