पूरग्रस्त भागात प्राप्तिकर व जीएसटी विवरणपत्रांसाठी मुदत वाढविण्याची मागणी- अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 15:22 IST2019-08-19T15:22:35+5:302019-08-19T15:22:45+5:30
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांना प्राप्तिकर आणि जीसएटी विवरणपत्रे भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

पूरग्रस्त भागात प्राप्तिकर व जीएसटी विवरणपत्रांसाठी मुदत वाढविण्याची मागणी- अशोक चव्हाण
मुंबईः पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांना प्राप्तिकर आणि जीसएटी विवरणपत्रे भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. चव्हाण यांनी यासंदर्भात केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र पाठवले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना नुकताच अतिवृष्टी व महापुराने जबर तडाखा दिला असून, तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पूर ओसरल्यानंतर अजूनही तेथील परिस्थिती सुरळीत झालेली नाही. त्यामुळे दर महिन्याला भरावी लागणारी जीएसटीची विवरणपत्रे आणि वार्षिक आयकर विवरणपत्र दाखल करणे अनेकांना शक्य नाही. ही समस्या लक्षात घेता केंद्र सरकारने पूरग्रस्त भागासाठी वाढीव मुदत देण्याची आवश्यकता आहे.
या पुरामध्ये हजारो घरे व दुकाने कित्येक तास पाण्याखाली राहिल्याने संगणक व कागदपत्रे खराब झाली आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा व इंटरनेटचीही समस्या आहे. त्यामुळे या मागणीची केंद्र सरकारने गांभिर्याने दखल घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात व्यक्त केली आहे.