वैद्यकीय सामग्रीचे वितरण, स्थलांतरीत मजुरांसाठी पैसे पाठवण्याची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 19:56 IST2020-04-20T19:33:37+5:302020-04-20T19:56:15+5:30
अत्यावश्यक वस्तू राज्याच्या व देशाच्या विविध भागात पोचवण्यासाठी टपाल खात्याचे कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात देखील कार्यरत आहेत.

वैद्यकीय सामग्रीचे वितरण, स्थलांतरीत मजुरांसाठी पैसे पाठवण्याची सुविधा
मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांना व वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असलेली विविध उपकरणे, औषधे, पीपीई व इतर अत्यावश्यक वस्तू राज्याच्या व देशाच्या विविध भागात पोचवण्यासाठी टपाल खात्याचे कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात देखील कार्यरत आहेत. लॉकडाऊन कालावधीत टपाल खात्याच्या मुंबई विभागाद्वारे 1 हजार 800 किलो वैद्यकीय उपकरणे, औषधे देशाच्या विविध भागात पाठवण्यात आले.
स्थलांतरीत मजुरांना गावी पैसे पाठवण्यामध्ये भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन 150 स्थलांतरीत मजुरांची इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची खाती सुरु करण्यात आली अाहेत. अंधेरी पूर्व टपाल कार्यालयात सर्वात जास्त खाती उघडण्यात आली आहेत. कल्याण, बोरीवली, पनवेल व कळवा अशा चार ठिकाणांहून टपाल कर्मचाऱ्यांना मुंबईत विविध टपाल कार्यालये व जीपीओ मध्ये कामावर येण्यासाठी बेस्ट च्या चार बस सुरु करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे प्रत्येक बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग ची काळजी घेऊन वाहतूक सुविधा पुरवण्यात आली आहे. सोमवारपासून अधिक डिलिव्हरी पोस्ट कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. पुढील पंधरा दिवस या ठिकाणी पोस्टमन कर्मचारी कामावर हजर राहून सॉर्टिंगची कामे करतील. 90 कार्यालयांमध्ये टपाल कर्मचाऱ्यांद्वारे फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. मुंबईत अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांपैकी दोन हजार मजुरांना व झोपडपट्टीवासीयांना जेवण दिले जात आहे. त्याशिवाय धारावी मधील नागरिकांना मास्क व सँनिटायझर देखील पुरवले जात आहेत. या मजुरांपैकी अनेक मजूर बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील आहेत. त्यांना आपल्या घराकडे पैसे तत्काळ पैसे पाठवण्यासाठी आयपीपीबी अकाउंट चा लाभ होत आहे.
मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरु आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेक कर्मचारी अडकले असले तरी अत्यावश्यक सेवा म्हणून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हे काम केले जात असल्याचे पांडे म्हणाल्या. सध्या सुरु असलेल्या टपाल कार्यालयांना त्या जवळपास दररोज भेट देत असून टपाल कर्मचाऱ्यांची सुरक्षितता कायम राहण्यासाठी व्यक्ति श: लक्ष ठेवून आहेत. काम करताना सोशल डिस्टन्सिंग पाळून काम केले जाईल याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.