दीपक तिजोरींची अडीच लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:26 IST2026-01-15T08:26:03+5:302026-01-15T08:26:32+5:30
कविता शिबाग कपूर व फौजिया आरशी यांच्यावर गुन्हा

दीपक तिजोरींची अडीच लाखांची फसवणूक
मुंबई : चित्रपट निर्मितीसाठी भांडवल उभारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते दीपक तुलसीदास तिजोरी (वय ६३) यांची अडीच लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी कविता शिबाग कपूर व फौजिया आरशी यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
तिजोरी हे १९९० सालापासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी डिसेंबर २०२४ मध्ये टॉम डीक अँड मॅरी या हिंदी चित्रपटाचे लेखन केले असून, त्याच्या निर्मितीसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या भांडवलाची गरज होती. चित्रपट क्षेत्रातील ओळखींच्या माध्यमातून झायेद नावाच्या ब्रोकरद्वारे त्यांची ओळख कविता कपूर हिच्याशी झाली. कपूर हिने टी-सिरीजमध्ये कार्यरत असून, झी नेटवर्क व मीडिया क्षेत्रात चांगल्या ओळखी असल्याचे सांगितले. दरम्यान, फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात तिने तिजोरी यांच्या घरी भेट देऊन चित्रपटासाठी गुंतवणूक मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कपूर हिने मैत्रीण फौजिया आरशी हिची तिजोरी यांच्याशी ओळख करून दिली. आरशी ही निर्माती असून झी नेटवर्कशी जवळचे संबंध असल्याचे सांगण्यात आले. झी नेटवर्ककडून 'लेटर ऑफ इंटरेस्ट' मिळवून देण्यासाठी आधी २.५० लाख रुपये देण्याची अट घातली.
चौकशीअंती दोघींची पोलखोल
दोर्धीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिजोरी यांनी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी आरशी हिच्यासोबत सामंजस्य करार केला व २२ फेब्रुवारीला नेट बँकिंगद्वारे २.५० लाख रुपये अॅक्सिस बँकेतील खात्यामध्ये वर्ग केले. मात्र, ठरलेले 'लेटर ऑफ इंटरेस्ट' मिळाले नाही. चौकशी केल्यानंतर तिचा झी नेटवर्कशी काहीएक संबंध नसल्याचे उघडकीस आले. अखेर कपूर व आरशी यांनी संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी तिजोरी यांनी पोलिसांत तक्रार केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.