Join us

दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 14:30 IST

अजित पवार उपमुख्यमंत्री बनल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

मुंबई - दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री १२ पर्यंत करण्यात यावी आणि गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच दहीहंडी मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली. अजित पवार उपमुख्यमंत्री बनल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह गोविंद मंडळांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी येथे भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बालगोपाळांचा विमा उतरवण्यात यावा. दहीहंडी खेळाला साहसी दर्जा देण्यात आला आहे. परंतु, याबाबत सरकारमार्फत उपाययोजना झालेली नाही तरी साहसी खेळासाठी आपण पुढाकार घेऊन सरकार व दहीहंडी पथकांमध्ये समन्वय साधून या साहसी खेळासाठी स्पर्धा आयोजित करण्यात यावी. आयोजकांवर ज्या जाचक अटी लादण्यात आल्या आहेत त्या शिथील कराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दरम्यान, अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. तर, आगामी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवासाठी आता राष्ट्रवादीने पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे सार्वजनिक सुट्टीची मागणी केलीय. 

टॅग्स :अजित पवारदहीहंडीराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई