ठरलं! या दिवशी पेटारा उघडणार, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला 'अर्थसंकल्प'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:49 AM2023-02-08T11:49:42+5:302023-02-08T12:21:40+5:30
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह विरोधीपक्षनेत्यांची यासंदर्भात बैठक झाली
मुंबई - केंद्र सरकारने देशाचे बजेट २०२३ सादर केल्यानंतर आता राज्य सरकारच्या बजेटची सर्वांनाच आतुरता लागली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच बजेट असल्याने सर्वसामान्यांना काय बजेटमधून काय मिळणार, बजेटमध्ये कोणाला फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, आता महाराष्ट्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत राज्य सरकारचे बजेट सादर होणार आहे. त्यामध्ये, ९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह विरोधीपक्षनेत्यांची यासंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये, आगामी अर्थसंकल्पावर चर्चा झाली असून पुढील महिन्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने बजेट सादर केल्यानंतर राज्येच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या बजेटसाठी थेट जनतेतून सूचना आणि संकल्पना मागविल्या आहेत. २७ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असून, आज कामकाज सल्लागार समितीसोबत झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यात आले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन ५ आठवडे घ्या - पवार
नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केला.