Death of another account holder of PMC Bank | पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

मुंबई : उपचारासाठी पैसे नसल्याने पंजाब अँड नॅशनल को-आॅपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) आणखी एका खातेदाराचा सोमवारी मुलुंडमध्ये मृत्यू झाला. अँड्र्यू लोबो असे त्यांचे नाव आहे. लोबो हे मुलुंडमध्ये पत्नीसोबत राहायचे. निवृत्तीनंतर त्यांनी व्यवसाय आणि घर विकून त्यातून मिळालेले पैसे पीएमसी बँकेत जमा केले. त्यावर मिळणाऱ्या व्याजातून ते औषधांचा खर्च भागवत होते. त्यांच्या पुतण्याचा मुलगा ख्रिस याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांना फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना आॅक्सिजन मशीनची आवश्यकता होती. मात्र, पीएसमी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा ४० हजार रुपयांपर्यंतच असल्याने त्यांच्याकडे मशीन खरेदीसाठी पुरेसा पैसा नव्हता. यातच सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांकडून पीएमसी बँक घोटाळ्यामुळे त्यांचा मृत्यू झाला नसल्याचेही सांगण्यात येत आहे. आतापर्यंतचा हा सातवा बळी आहे.

यापूर्वीच्या घटना

14 ऑक्टोबर : ओशिवारा येथे राहणारे संजय गुलाटी जेट एअरवेजमध्ये कामाला होते. जेट एअरवेज बंद झाल्याने नोकरी गेली. त्यात, पीएमसी बँकेमधील खात्यातील पैशांवर निर्बंध आले. बँकेविरुद्ध आंदोलन उरकून घरी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे ९० लाख बँक खात्यात होते.

१५ आॅक्टोबर : पीएमसी बँकेचे खातेदार असलेल्या मुलुंडच्या भट्टोमल पंजाबी यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
१५ आॅक्टोबर : पीएमसी बँक खात्यात १ कोटी असलेल्या वर्सोव्यातील डॉ. योगिता बिजलानी यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.
१८ आॅक्टोबर : मुलुंड कॉलनीतील रहिवासी मुरलीधर धर्रा (८३) यांचा हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. त्यांचे ६० हजार रुपये बँक खात्यात होते.
२० आॅक्टोबर : मुलुंडच्या रहिवासी असलेल्या भारती सदारंगानी (७३) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे अडीच कोटी रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत.
३१ आॅक्टोबर : मुलुंडचे रहिवासी आणि पीएमसी बँकेचे खातेदार असलेल्या केशुमलभाई हिंदुजा (६८) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

आरबीआय कार्यालयाबाहेर खातेदारांचा ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय) बीकेसी येथील कार्यालयाबाहेर मंगळवारी सकाळी ५० ते ५५ पीएमसी बँक खातेदारांनी आंदोलन केले. मात्र, कुठलाही मार्ग न निघाल्याने सायंकाळच्या सुमारास काही खातेदारांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटीसाठी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेत, त्यानंतर त्यांना सोडून दिले.
आरबीआयबाहेर मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास खातेदारांनी निदर्शने केली. बँकेत अडकलेले पैसे परत करण्याची मागणी केली. यावर आरबीआयच्या कार्यकारी संचालक उमा शंकर यांनी मध्यस्थी करत खातेदारांची समजूत काढली. तरीही खातेदार तेथेच तळ ठोकून होते. याच दरम्यान एनएसई कार्यालयात
एका सरकारी कार्यक्रमासाठी अर्थमंत्री सीतारामन येणार असल्याची माहिती खातेदारांना मिळाली. त्यानुसार, काही आंदोलक खातेदार एनएसई बाहेर धडकले. त्यांनी सीतारामन यांना निवेदन देण्यासाठी आत सोडण्याचा तगादा लावला. मात्र, सरकारी कार्यक्रम असल्याने पोलिसांनी त्यांना नकार दिला. तेथेही देखील खातेदारांनी निदर्शने केली. पर्यायी ९ जणांना बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर, त्यांना समज देऊन सोडून दिल्याचे बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कदम यांनी सांगितले.
त्यानंतर, एनएसई कार्यालयाकडून काही बँक खातेदार महिला पुन्हा आरबीआय कार्यालयाबाहेर आल्या. तेथे त्यांनी पुन्हा निदर्शने केली. आरबीआयच्या कार्यकारी संचालक उमा शंकर यांनी पुन्हा सर्वांना समजाविले. अखेर, सायंकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास खातेदार तेथून निघून गेले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Death of another account holder of PMC Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.