Join us

"काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण..."; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 23:56 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde Raj Thackeray Meet: सत्ताधारी महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु असतानाच मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर पोहोचले. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एकत्र भेटल्याचे पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे शिवतीर्थवर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी आले असल्याची माहिती देण्यात आली असली तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती असं म्हटलं.  

शिवसेना शिंदे गटाकडून या बैठकीचे वर्णन सदिच्छा भेट असे केले असले तरी याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. कुणाल कामराने एकनाथ शिंदेंना लक्ष्य केल्यानंतर मनसे नेत्याने त्याचे कौतुक केले होते. या वादानंतर एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंना भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार उभा केला होता. यामुळे अमित ठाकरे यांना ही जागा गमवावी लागली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ही जागा जिंकली होती. अशातच आता महापालिका निवडणुकीसाठी नवी समीकरणे जुळवली जाण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

"आता जवळपास निवडणुका नाहीत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण जेव्हा तयार होतं तेव्हाच युती, महायुतीची चर्चा होते. पण आज महायुतीबद्दलची कुठलीही चर्चा नव्हती. ही केवळ सदिच्छा भेट होती. बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी मनमोकळेपणाने उजाळा दिला. त्यामुळे काही लपवून ठेवण्याचे काही कारण नाही. यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिल्यामुळे भेटीसाठी एवढा वेळ लागला," असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"विरोधकांना चिंता करण्याचे कारण नाही. लोकसभेमध्ये राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत होते. बघायला गेले तर आमचे विचार मिळते जुळते आहेत. विरोधकांनी काम करावे. घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते. ते आम्ही करतो आहोत त्यामुळे आम्हाला निवडणुकांची चिंता नाही. कधीही निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार आहोत," असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी माहिम विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबतही प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी, आज कुठलीही निवडणुकीची जुनी आठवण नव्हती, फक्त बाळासाहेबांच्या आठवणी आणि पक्षातल्या घडामोडींवर गप्पा मारल्या, असं म्हटलं.

"गेल्या काही दिवसांपासून, विधानसभा निवडणूक झाल्यापासून भेटण्याची, गप्पा मारण्याची दोघांचीही इच्छा होती. आज बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींवर चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. त्यामुळे राजकीय अर्थ काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही," असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :एकनाथ शिंदेराज ठाकरेमनसे