बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 09:34 IST2025-11-14T08:16:31+5:302025-11-14T09:34:35+5:30
Mumbai Police: मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या ड्रग्ज सिंडिकेटमध्ये बॉलिवूड कलाकारांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे.

बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
Salim Dola Drug Syndicate: दुबईमध्ये बसलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी थेट संबंध असलेल्या एका विशाल आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेलने केलेल्या या सर्वात मोठ्या कारवाईमुळे केवळ देशातील सातहून अधिक राज्यांमध्ये पसरलेले मेफेड्रोन ड्रग्जचे जाळे समोर आलं आहे.यासोबत हायप्रोफाईल ड्र्ग्ज पार्टीचीही पोलखोल झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदु असलेल्या सलीम डोलाच्या गँगचा सदस्य मोहम्मद सलमान सफी शेख याला दुबईतून भारतात आणण्यात आले आहे. या आरोपीने चौकशीदरम्यान बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री, अभिनेते, निर्माते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांची नावे घेतली आहेत. त्यामुळे आता तपास यंत्रणांनी या सर्व मोठ्या सेलिब्रिटींना समन्स बजावण्याची तयारी सुरू केली आहे.
सलीम डोलाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणात मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख याला अटक केल्यानंतर बॉलिवूड, राजकारण आणि अंडरवर्ल्डमधील ड्रग्ज संबंध पुन्हा एकदा उघड झाले आहेत. सलीम डोला हा पूर्वीपासूनच त्याचा मुलगा ताहिर डोला याच्यामार्फत भारतात मेफेड्रोन म्हणजे ‘मेयाउ-मेयाउ’ ड्रग्जची तस्करी करत होता. तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या गोपनीय कागदपत्रांनुसार, आरोपी ताहिर डोला याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने कबूल केले आहे की, तो मुंबई, गोवा, दुबई आणि थायलंडसह देश-विदेशांत हाय-प्रोफाइल ड्रग्ज पार्ट्या आयोजित करत होता. या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडचे मोठे कलाकार, मॉडेल्स, रॅपर्स आणि चित्रपट निर्माते सहभागी होत होते.
आज तकच्या वृत्तानुसार, न्यायालयात सादर केलेल्या रिमांड कॉपीमध्येही पोलिसांनी नमूद केले आहे की, आरोपी देश आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्यांचे आयोजन करायचा आणि स्वतः सप्लायर म्हणून उपस्थित राहायचा. ताहिर डोलाने अभिनेत्री नोरा फतेही, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धांत कपूर, ओरहान (ओरी), झीशान सिद्दीकी, अलीशाह पारकर (दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा), अब्बास-मस्तान (चित्रपट निर्माते ) रॅपर लोका यांची नावे घेतली आहे.
ताहिर डोलाने दावा केला की, या सर्व व्यक्तींसोबत त्याने देशात आणि देशाबाहेर ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्या आणि त्यामध्ये ड्रग्ज पुरवले. ज्या व्यक्तींची नावे समोर आली आहेत त्यांचे इतर ड्रग्ज तस्करांशी काही संबंध आहेत का याचीही तपासणी या तपासात केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर पूर्वीच्या ड्रग्ज पार्ट्यांमध्ये सहभागी होते का आणि असल्यास ते कसे सहभागी होते याचीही चौकशी केली जाईल.
७ हून अधिक राज्यांत जाळे
या सिंडिकेटचे जाळे फक्त मुंबई-गोवा पुरते मर्यादित नाही, तर ते ७ हून अधिक राज्यांत पसरलेले आहे. दुबईतून ड्रग्जची तस्करी हवाई आणि सागरी मार्गाने केली जात होती. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची शक्यता लक्षात घेऊन, मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखा आणि ईडीने एकत्र तपास सुरु केला आहे. ईडी आता या ड्रग्जच्या काळ्या कमाईचे पैसे हवाला किंवा रियल इस्टेटमध्ये गुंतवले जात होते का, याची कसून तपासणी करणार आहे.