दाऊदा साथीदार तब्बल २९ वर्षांनी जाळ्यात; एन. एम. जोशी मार्ग पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:19 IST2025-02-01T12:19:32+5:302025-02-01T12:19:52+5:30
अटक आरोपी प्रकाश रतीलाल हिंगू (६३) त्यावेळी अंधेरी येथील जुहू लेन परिसरात राहायचा.

दाऊदा साथीदार तब्बल २९ वर्षांनी जाळ्यात; एन. एम. जोशी मार्ग पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड प्रकाश रतीलाल हिंगू (६३) याला ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी शुक्रवारी कर्नाटकमधील हुबळीतून बेड्या ठोकल्या. १९९६ मध्ये हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयीन सुनावणीला गैरहजर राहून तो फरार झाला होता. २९ वर्षानी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपी कर्नाटकात ओळख लपवून राहत होता.
आर्थर रोड कारागृहात १९९६ मध्ये दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड व छोटा राजन टोळीतील गुंड न्यायालयीन कोठडीत होते. दोन्ही टोळ्यांमधील गुंडांनी कारागृहात हाणामारी करत एकमेकांवर जीवघेणा हल्ला चढवला. याप्रकरणी दाऊद आणि छोटा शकीलच्या गुंडांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक आरोपी प्रकाश रतीलाल हिंगू (६३) त्यावेळी अंधेरी येथील जुहू लेन परिसरात राहायचा.
याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आरोपी न्यायालयीन प्रक्रियेसाठी गैरहजर राहू लागला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला २००५ मध्ये फरार घोषित केले होते. हिंगू ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ देशमाने व पथकाने हुबळीला जाऊन आरोपीचा शोध घेतला. अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकताच त्याला अटक केली.