Join us  

"शिवसैनिकांनीच मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा", 'त्या' अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 1:26 PM

कांदिवली येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबई - नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. कांदिवली येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणानंतर अधिकाऱ्याच्या मुलीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच शिवसैनिकांनीच आपल्या वडिलांना मारहाण केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही मुलीने केली आहे.

नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. त्यामुळे काही शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. शर्मा यांची कन्या शीला यांनी वडिलांवर झालेल्या हल्ल्यासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. एक कार्टून फॉरवर्ड केल्याने माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या. शिवसेनेच्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्लाही केला असं म्हटलं आहे. 

"राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही, राष्ट्रपती राजवट लागू करा"

शीला यांनी पोलीस घरी आले आणि त्यांनी वडिलांना सोबत येण्यासाठी जबरदस्ती केली. आम्ही हल्ल्याप्रकरणी एफआरआय नोंदवला आहे. राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे असं देखील शीला यांनी म्हटलं आहे. भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करुन शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 65 वर्षाच्या मदन शर्मा नावाचे माजी नौदल अधिकारी कांदिवली पूर्व येथे ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहतात.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तीन जणांना अटक 

शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. यानंतर कमलेश कदम नावाच्या व्यक्तिचा मला फोन आला. त्यांनी माझं नाव आणि पत्ता विचारला. दुपारी ते लोक बिल्डींग खाली आले त्यांनी मला खाली बोलावलं. बिल्डींगच्या गेटवर 8 ते 10 जणांनी मला बेदम मारहाण केली. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी याबाबत समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कमलेश कदमसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, ही घटना अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. केवळ व्हॉट्सअपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला या गुंडांनी मारले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशा घटना रोखल्या पाहिजेत. या गुंडावर कठोर कारवाई करुन त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी

"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास", मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात...

अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार

"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल

CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा

टॅग्स :शिवसेनापोलिसमुंबईअतुल भातखळकरदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे