रेल्वेतून पडून मृत्यू झालेले पोलीस कर्मचारी दत्तात्रेय शिंदे यांच्या कुटुंबीयांचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केले सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 15:56 IST2017-10-29T15:56:42+5:302017-10-29T15:56:58+5:30

रेल्वेतून पडून मृत्यू झालेले पोलीस कर्मचारी दत्तात्रेय शिंदे यांच्या कुटुंबीयांचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केले सांत्वन
मुंबई - दत्तात्रेय शिवाजी शिंदे (रेल्वे पोलीस) यांचा शनिवारी मुंबई येथे रात्रपाळीसाठी कर्तव्यावर येत असताना त्यांचा अपघाती मृत्यु झाला होता. त्याबाबतचे वृत्त 'लोकमत'च्या रविवारी प्रसिद्ध झाले. गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांच्या ती निदर्नास आल्यानंतर ते अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे कुटुंबियांना क्षणाचा विलंब न करता दूरध्वनीद्वारे संपर्क साधला व त्यांचे सांत्वन केले. यावेळी पाटील यांनी त्यांच्या पत्नी व मुलगा यांच्याशी देखील संवाद केला. त्यांच्या कुटुंबाला शासन स्तरावरून सर्व प्रकारची मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले.
रात्रपाळीसाठी कर्तव्यावर येत असताना रेल्वे पोलीस हवालदार दत्तात्रेय शिवाजी शिंदे यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला होता. वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात रात्रपाळीसाठी हजर होत असताना कांजूरमार्ग स्थानकाजवळ ते जखमी अवस्थेत आढळले. रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.
शिंदे हे कल्याण येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. शुक्रवारी रात्री रात्रकालीन कर्तव्यावर हजर होण्यासाठी शिंदे घरातून निघाले होते. मात्र कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात पोल क्रमांक २४/६ ते २४/७ यांदरम्यान रुळाशेजारी पडलेल्या अवस्थेत आढळले. रात्री १०.१५ ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. शिंदे यांच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली होती. रुळाजवळ शिंदे जखमी असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शिंदे यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले.