ऑस्करच्या ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये ‘दशावतार’ची धडक; जगभरातील १५० सिनेमांमध्ये मानाचे स्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:14 IST2026-01-04T09:13:18+5:302026-01-04T09:14:33+5:30
ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये दाखवला जाणारा ‘दशावतार’ हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याचे सुबोध खानोलकरने सोशल मीडियावर लिहिले आहे.

ऑस्करच्या ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये ‘दशावतार’ची धडक; जगभरातील १५० सिनेमांमध्ये मानाचे स्थान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तिकिटबारीवर लक्षवेधी कमाई करणारा सुबोध खानोलकर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘दशावतार’ ऑस्करमध्येही ठसा उमटवत आहे. मुख्य स्पर्धेसाठी जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवडण्यात आलेल्या १५० हून अधिक चित्रपटांमध्ये ‘दशावतार’चाही समावेश आहे. ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याचे सुबोधने सोशल मीडियावर लिहिले आहे.
दिग्दर्शक सुबोध खानोलकरने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिनेप्रेमींना आनंदाची बातमी दिली आहे. सुबोधने या पोस्टसोबत ‘दशावतार’च्या निर्मात्यांना आलेल्या संदेशाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यात ‘नमस्कार सुजय, ॲकॅडमी स्क्रीनिंग रूममध्ये दशावतार लाइव्ह असेल’, असे लिहिले आहे. याबाबत सुबोधने आनंद व्यक्त करीत लिहिले की, जिंकणं हरणं नंतरची गोष्ट, पण मुख्य जागतिक प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणं हे प्रचंड अभिमानास्पद आहे. ही फक्त सुरुवात आहे. आम्ही सातत्याने चांगलं बनवण्याचा आणि ते जगासमोर आणून मराठीची मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू, असे आश्वासनही सुबोधने दिले आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेले दशावतारी कलाकार बाबुली मेस्त्री यांची व्यक्तिरेखा रसिकांना खूप भावली.