दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 06:35 IST2025-06-05T06:35:15+5:302025-06-05T06:35:47+5:30

कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे? जाणून घ्या

Dahisar to Andheri Metro 2A and Dahisar to Gundavli Metro 7 lines have been declared carbon neutral corridors. | दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर

दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर ठरल्या आहेत. मेट्रो आणि रस्त्यावरील वाहन प्रवासाच्या प्रतिकिलोमीटर हरितगृह वायू उत्सर्जनाची तुलना केली असता, तब्बल ८५,८४९ टन कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाएवढे उत्सर्जन घटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या या मेट्रो मार्गिकांमुळे पर्यावरणपूरक प्रवासावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एमएमआरडीएतर्फे आयोजित एका विशेष सोहळ्यात या मेट्रो मार्गिकांसाठीची कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट प्रमाणपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना औपचारिकरित्या प्रदान करण्यात आली. एमएमएमओसीएलने या मार्गिकांची कार्बन न्यूट्रॅलिटी तपासण्यासाठी थर्ड पार्टी ऑडीट केले होते. यामध्ये या मार्गिका पीएएस २०६०:२०१४ या आंतरराष्ट्रीय मानकानुसार कार्बन न्यूट्रल असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय युनिव्हर्सल कार्बन रजिस्ट्रीने (यूसीआर) २०२३ ते २०२४ या दोन वर्षांसाठी एमएमएमओसीएलला ८५,८४९ कार्बन ऑफसेट युनिट्स (सीओयू) जारी केली आहेत.

कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे?

वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण आणि त्याची भरपाई करणाऱ्या प्रकल्पांमधून मिळणारे कार्बन क्रेडिट यांच्यात संतुलन साधणे. यामुळे एकूण कार्बन उत्सर्जन ‘शून्य’ होते. मेट्रो सेवा चालवताना होणाऱ्या उत्सर्जनात प्रामुख्याने वीज वापरामुळे होणाऱ्या उत्सर्जनाचा समावेश असतो. हे उत्सर्जन मोजून ते वैध व प्रमाणित कार्बन क्रेडिट प्रकल्पांद्वारे या उत्सर्जनाची भरपाई करता येते. नागरिकांकडून खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक मेट्रो सेवा वापरल्यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होते. त्यातून हे कार्बन क्रेडिट मिळते.

असा होणार फायदा

  • मुंबई शहरातील हवेच्या प्रदूषणात घट आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा.
  • भारताच्या एनसीडी उद्दिष्टांनुसार हरितगृह वायू उत्सर्जनात घट. 
  • जीवाश्म इंधनांवरील अवलंब कमी करून हवामान बदलासंदर्भातील प्रतिकारक्षमता अधिक बळकट होते.
  • या पायाभूत सुविधांमुळे, हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी जगभरातून मिळणारा निधी आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी गुंतवणूक आकर्षित करता येते.

Web Title: Dahisar to Andheri Metro 2A and Dahisar to Gundavli Metro 7 lines have been declared carbon neutral corridors.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो