मुंबई : दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना काही गोविंदा थरावरून कोसळल्यामुळे जखमी झाले आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत एकूण ३० गोविंदा जखमी झाले आहेत, तर बाल गोविंदांसाठी दहीहंडी उभारण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथे एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. दुपारी तीनच्या सुमारास बाल गोविंदांसाठी दहीहंडी उभारत असताना ३० वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी हे खाली पडले. त्यांना तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
दहीहंडीच्या दिवशी विविध ठिकाणी थर चढवताना घडलेल्या अपघातांमध्ये ३० गोविंदा जखमी झाले. यातील १५ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, उर्वरित १५ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
मुंबई शहरात एकूण १८ गोविंदा जखमी झाले असून, त्यापैकी १२ रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि ६ जणांना घरी पाठवण्यात आले आहे.
पूर्व उपनगरात ६ जण जखमी झाले असून, ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि ३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
पश्चिम उपनगरातही ६ जण जखमी झाले असून, त्यातील १ रुग्णावर उपचार सुरू आहेत तर ५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.