Cyclone Tauktae : मच्छिमार बांधवांना दिलासा, अस्लम शेख यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 19:11 IST2021-05-18T19:09:20+5:302021-05-18T19:11:14+5:30
Cyclone Tauktae : सोमवारी अरबी समुद्रात उसळलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांचे फार नुकसान झालेले आहे.

Cyclone Tauktae : मच्छिमार बांधवांना दिलासा, अस्लम शेख यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मुंबईतील विविध किनारपट्टी ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांनी मालाड-मढ, खारदांडा, माहिम व कुलाबा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व मच्छिमार बांधवांना दिलासा दिला.
सोमवारी अरबी समुद्रात उसळलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांचे फार नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त भागाची अस्लम शेख यांनी अधिकाऱ्यासह पाहणी केली. यावेळी अस्लम शेख म्हणाले की, या चक्रीवादळामुळे मच्छीमार नौका, जाळी व किनारपट्टीनजीकची घरे यांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याकडून तौक्ते वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर मच्छीमारांनी आपल्या नौका नांगरुन ठेवल्या होत्या. तरीही वादळाच्या तीव्रतेमुळे बोटींचे नुकसान झाले.
तसेच, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मदत जाहीर करण्यात येईल, असे अस्लम शेख यांनी सांगितले. यावेळी, त्यांच्यासोबत आमदार भाई जगताप, मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सहसचिव राजेंद्र जाधव, प्रादेशिक उपायुक्त कोकण विभाग देवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.