Join us  

Cyclone Nisarga: ...म्हणून निसर्ग चक्रीवादळापासून मुंबई वाचली; हवामान खात्यानं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 8:29 AM

मुंबईला निसर्ग चक्रीवादळाने चकवा देत दिशा बदलल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला होता.

मुंबई: निसर्ग चक्रीवादळाचामुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती स्कायमेटनं दिल्यानंतर मुंबईकरांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला होता. अलिबागला धडकलेलं वादळ मुंबईला येण्याची शक्यता व्यक्त झाल्यानं शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज होती.  दुपारी एक ते दीडच्या सुमारास अलिबागला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा थोडाफार फटका मुंबईलादेखील बसला. अलिबागला धडकलेलं चक्रीवादळ हळूहळू मुंबईच्या दिशेनं सरकत होतं. मात्र काही वेळेनंतर मुंबईला चकवा देत चक्रीवादळाने दिशा बदलली आणि ते पनवेल खोपोली, नाशिक मार्गे सरकत गेले.

मुंबईवरचा धोका टळल्यानंतर हवामान खात्यातील एका अधिकाऱ्याने मुंबई निसर्ग चक्रीवादळापासून का वाचली याचे कारण सांगितले आहे. हवामान खात्यातील अधिकारी म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळाने अपेक्षित जागेपेक्षा थोडं दक्षिणेतील जमिनीला धडक दिली. तसेच एकदा जमिनीवर आल्यावर वादळाची तीव्रता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे मुंबईचं अपेक्षेप्रमाणे खूप कमी नुकसान झालं असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच निसर्ग चक्रीवादळाचा पहिला फटका अलिबाग परिसराला आणि रायगड जिल्ह्याला बसला आणि वादळाने थोडी दिशा बदलत पनवेल, खोपोलीचा रस्ता धरत उत्तर आणि ईशान्येकडे वाटचाल सुरू केली, असं त्यांनी सांगितले.

मुंबईला निसर्ग चक्रीवादळाने चकवा देत दिशा बदलल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून जनतेचे आभार देखील मानले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला. संकट म्हटले तर मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झुंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबा देवीचीच कृपा मुंबईवर आहे, तशी पंढरपूरच्या विठु माऊलींचे आशीर्वाद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

तत्पूर्वी, निसर्ग चक्रीवादळामुळे सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम होता. शिवाय सातत्याने वाहत असलेल्या वाऱ्याचा वेगही कायम होता. दुपारी पावसाचा आणि वाऱ्याचा वेग वाढू लागला असतानाच ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्र किनारी राहत असलेल्या, पश्चिम किनारपट्टीवरील, धोकादायक व समुद्र किना-यानजीकच्या वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निश्चित करण्यात होत्या. आणि तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

टॅग्स :निसर्ग चक्रीवादळमुंबईपाऊसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र