मुंबई : सायबर सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहेच. याशिवाय युवकांना सुरक्षित भारताचे रक्षक बनण्यासाठीचे सक्षम माध्यम आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत तरुणांना नवी संधी मिळावी, यासाठी त्यांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी केले. कांदिवली येथे डीएससीआय ॲडव्हान्स्ड सायबर स्किल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यूपीआय पेमेंटचा वापर सर्व गटांतील व्यक्तींकडून केला जात आहे. तंत्रज्ञानामुळे ही समानता निर्माण केली आहे. भारताच्या विकासात तरुणांचे योगदान असावे, यासाठी त्यांना अत्याधुनिक डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज करून रोजगार मिळावा. त्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. उत्तर मुंबई व परिसरातील १०,००० हून अधिक युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या संधी सेंटरमुळे प्राप्त झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, एआय, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा कोर्सेस या सेंटरमधून दिले जाणार आहेत. विविध उद्योगांनी प्रशिक्षित विद्यार्थ्यांना इंटर्नशिप व प्लेसमेंट उपलब्ध करूनद्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘डीएससीआय’चे सीईओ विनायक गोडसे, किंद्रिल इंडिया प्रेसिडेंट लिंगराजू सावकार, आमदार संजय उपाध्याय, आमदार मनीषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर या वेळी उपस्थित होते.