राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल ८८२ कोटींचा गंडा; २,६६८ गुन्ह्यांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:29 IST2025-07-28T12:29:00+5:302025-07-28T12:29:00+5:30

केवळ २६७ गुन्ह्यांची उकल; २८९ आरोपी अटकेत 

cyber fraud worth rs 882 crore in the state 2 thousand 668 cases registered | राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल ८८२ कोटींचा गंडा; २,६६८ गुन्ह्यांची नोंद 

राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल ८८२ कोटींचा गंडा; २,६६८ गुन्ह्यांची नोंद 

महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार होत असल्याचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी जानेवारी ते मे २०२५ या चार महिन्यांत शेकडो नागरिकांना तब्बल ८८२.९७ कोटी रुपयांचा गंडा घातला. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत सायबर सेलकडे पोलिसांकडे २६६८ गुन्ह्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यातील केवळ २६७ प्रकरणांचा तपास लागला आणि २८९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विधिमंडळात सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही माहिती उजेडात  आली आहे. 

पालघर या आदिवासी जिल्ह्यात सायबर चोरट्ट्यांनी ८ कोटी ५७ लाख संपास केले. पालघरमध्ये  १,०९० ऑनलाइन तक्रारी आल्या आहेत. त्यातील ८० तक्रारी आदिवासींच्या आहेत. भामट्यांनी त्यांचे २४,५०,५९३ रुपये लांबविले आहेत. मात्र, तेथे एकाही आरोपीला अटक झालेली नाही. 

वसई-विरारमध्ये ४४ गुन्हे 

वसई, विरार, मीरा-भाईंदर येथील पोलिस ठाण्यात ४४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील १० गुन्हे उघड झाले असून एक आरोपी अटकेत आहे. येथील नागरिकांची ११,३७,६८,९२७ रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांतील केवळ ८,९५,४९० रुपये हस्तगत केले आहेत.

‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा’

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर फसवणुकीच्या प्रकरणांचा जलद गतीने तपास करण्यासाठी, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प’ हा अत्याधुनिक उपक्रम नवी मुंबईतील महापे येथील सायबर मुख्यालयात सुरू करण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे. 
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल सायबर पोलिस ठाण्यासह ६ प्रमुख विभाग कार्यरत असतील. हा प्रकल्प सायबर सुरक्षा व सायबर गुन्हे नियंत्रणासाठी अत्याधुनिक केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यभरात मागील तीन वर्षांत नाेंदविलेले गुन्हे 

वर्ष    दाखल गुन्हे उघड गुन्हे अटकेतील आरोपी फसवणुकीची रक्कम (कोटी)    हस्तगत रक्कम (कोटी)
                              
२०२३    ६,५८०    ५३९    ६६०    ५८१.९५    १०.८० 
२०२४    ८९७४    ९१०    १००७    ७६३४.२५    २१.१२ 
मे २०२५     २६६८    २६७    २८९    ८८२.९७    ३५.६६

 

Web Title: cyber fraud worth rs 882 crore in the state 2 thousand 668 cases registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.