Cyber crisis over the state due to Corona | कोरोनामुळे राज्यावर सायबर संकट

कोरोनामुळे राज्यावर सायबर संकट

मुंबई : कोरोनाबाबत अफवांचे पीक वाढू लागले असून त्याला धार्मिक रंग चढवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न जोर धरत आहेत. हे संकट कायम असताना डिजीटल सेवेकडे वाढलेला कल, शासनाकड़ून मिळणाऱ्या विविध सवलती, उपाययोजनाचा फायदा घेत सायबर भामटे फ़सवणुक करत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या  नावसाधर्म असलेल्या फसव्या लिंक तयार करून ऑनलाईन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अधिकृत लिंकवरूनच मदत करा, असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात आले. त्यासोबतच  प्रधानमंत्री बेरोजगार भत्त्ता योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून पैसे मिळतील, दोन महिन्यांसाठी नेटफिलक्स सेवा किंवा इंटरनेट सेवा मोफत देण्यात येईल, जीओचे पाचशे रुपयांचे रिचार्ज मोफत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रत्येकाला ६०जीबी इंटरनेट सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, आदी आमीषे समाजमाध्यमांवरून दाखविली जात आहेत. प्रत्यक्षात या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा  आमीषांना बळी पडू नका, असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाकडून होत असताना आता या सायबर भामटयांकडून बँक कर्जदारानाही टार्गेट केले आहे.

 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरबीआयने सर्व बँकाना त्यांच्या ग्राहकास शक्य तितक्या डिजिटल बँकिंग सुविधेचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे सायबर गुन्हे गारांनीही हा धागा पकड़ून फ़सवणुक करण्यास सुरुवात केली. यात, सद्यस्थितीत विविध बँकानी त्यांचे ग्राहकांना कर्ज खात्याशी संबंधित ईएमआय पुढे ढकलन्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचाच फायदा घेत ही ठग मंडळी बँक अधिकारी / कर्मचारी बोलत असल्याचे सांगून त्यांचे बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती घेत फ़सवणुक करत असल्याचे मुंबई सायबर पोलिसांच्या 

तपासात समोर येत आहे.  तसेच या ठगांनी खातेदारांना संदेश धाडून त्याद्वारे any desk, Quick Support, Team Viewer, Aur droid सारखे स्क्रीन शेअरिंग अप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईल व संगणकाचा अनधिकृत तांबा घेत फसवणूक करत असल्याचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.

.............................................

व्हॉट्सअपवरून अफवाना जोर...

गेल्या पाच दिवसांमध्ये समाजमाध्यमांवरून कोरोना प्रादुर्भावासाठी ठराविक एका समाजाला जबाबदार धरणया प्रकार वाढले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात सायबर पोलिसांनी एकूण २० गुन्हे नोंदवले. त्यापैकी १४ गुन्ह््यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार समोर आला. उर्वरित सहा गुन्हे कोरोबाबतच्या अफवा होत्या. अशात आतापर्यंत सायबर महाराष्ट्रकडून  राज्यभरात एकूण १३५ गुन्हे नोंदवण्यात आले. यात अफवा पसरवणे, चुकीच्या माहितीचा प्रसार करणे, दोन समाजात तेढ निर्माण होण्यासाठी प्रयत्ना करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा सर्वाधिक आधार घेतला गेला. यातील ७९ गुन्हे व्हॉट्सअ‍ॅपवरून सर्वदूर पसरलेल्या मजकुराशी संबंधीत आहेत. त्याखालोखाल फेसबूकशी संबंधीत २४ प्रकरणे आहेत.त्यामुळे सायबर महाराष्ट्रने व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यासाठी नियमावली जारी करण्यात आली.

........................................

काय करावे...

अनोळखी लिंक तसेच ऍप डाऊनलोड करू नये. कुणालाही आपली गोपनीय माहिती शेअर करू नये. जेथे फसवणूक होतेय असे वाटत असल्यास पोलिसांकड़े तक्रार करण्यांचेही सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात येत आहे. तर समुहात जबाबदार सदस्य असतील आणि ते खात्रीलायक मजकू र देतील, याची काळजी समुहाच्या प्रमुखाने म्हणजेच ग्रुप अ‍ॅडमीनने घेणे बंधनकारक आहे. साहित्य पाठवण्याबाबतच्या नियमांबाबत प्रमुखाने सदस्यांना जाणीव करून द्यावी. वेळोवेळी समुहातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. समुह नियंत्रणाबाहेर जात असेल तर प्रमुखाने सदस्यांचे हक्क काढून घ्यावा आणि समुहावर साहित्य पाठवण्याचा हक्क फक्त स्वत:कडे घ्यावा. समुहावरील आक्षेपार्ह मजकूराबाबत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, हे नियम समुह प्रमुखांसाठी असतील. या नियमांचे उल्लंघन के ल्यास भारतीय दंड संहितेतील कलम १५३ अ आणि ब, २९५ अ, ५०५, १८८ माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ क आणि ड, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५४, मुंबई पोलीस कायद्यातील कलम ६८ आणि फौजदारी दंड संहितेतील कलम १४४अन्वये गुन्हा नोंद केला जाईल, असे सायबर महाराष्ट्रने स्पष्ट केले आहे.

Web Title: Cyber crisis over the state due to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.