Cyber Crime: सायबर भामट्यांची क्रेडिट कार्डद्वारे दिवसाआड शॉपिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:22 IST2025-10-11T10:22:12+5:302025-10-11T10:22:27+5:30
Mumbai Cyber Crime News: आठ महिन्यांमध्ये तीन हजार गुन्ह्यांची नोंद : ३७ जणांना अटक

Cyber Crime: सायबर भामट्यांची क्रेडिट कार्डद्वारे दिवसाआड शॉपिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या ८ महिन्यांत सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच असून, सायबर गुन्ह्यांशी संबंधित २ हजार ९४८ गुन्हे नोंद झाले आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्याने साडेतीनशेचा आकडा पार केला आहे. यापैकी अवघ्या ७१ गुन्ह्यांची उकल करत ३७ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईत जानेवारी ते ऑगस्टदरम्यान २ हजार ९४८ गुन्हे नोंद झाले असून, त्यापैकी ७१ गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यात क्रेडिट कार्ड/ऑनलाइन फसवणुकीचे सर्वाधिक ३४४ गुन्हे नोंद असून, ७१ गुन्ह्यांची उकल करत ३७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे सायबर फसवणुकीत कस्टम गिफ्ट (३०), खरेदी (६२), नोकरी (२२७), बनावट वेबसाइट (६२), गुंतवणूक (१६३), कर्ज (३५) यांच्यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे.
‘माहिती शेअर करू नका’
ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा, जेणेकरून आपले पैसे वाचविण्यास मदत होईल.
पोलिसांकडून अशाप्रकारे अनेक गुन्ह्यांत पैसे वाचविण्यात यश आले आहे. तसेच, कुणालाही आपली गोपनीय माहिती शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
डेटा सुरक्षित करण्याच्या नावाखाली खाते रिकामे
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डेटा सुरक्षित करण्याच्या नावाखाली बँक खात्याची माहिती मिळवायची. पुढे याच माहितीद्वारे शॉपिंग करून खरेदी केलेल्या वस्तूंची विक्री करत बँक खाते रिकामे करण्याच्या घटनाही वेळोवेळी समोर येत आहे.
तत्काळ संपर्कांनंतर असे होते काम...
तक्रारदाराने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यास सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली याची माहिती घेतली जाते. ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच तत्काळ ते खाते गोठवण्यात येते. बँकेशी पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा मिळवून देतात.