कमी पैशात जास्त सदस्यांची नोंदणी; भाजपच्या नावाखाली ५०० लोकांची फसवणूक, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:04 IST2025-02-26T10:49:11+5:302025-02-26T11:04:05+5:30
भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली सायबर गुन्हेगाराने शेकडो लोकांची फसवणूक केली.

(प्रातिनिधीक छायाचित्र)
BJP Membership Campaign: भाजपने राज्यभरात २५ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट समोर ठेवून मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान सुरु केलं होतं. मात्र एका सायबर गुन्हेगाराने भाजपच्या सदस्या नोंदणीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदस्य नोंदणी करताना या सायबर चोरट्याने लोकांकडून पैसे उकळल्याची माहिती आहे. मुंबईतील भाजपच्या पदाधिकाऱ्याने याप्रकरणाची तक्रार दिल्यानंतर दिल्लीतल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबईसह राज्यभरात भाजपचे २५ लाख सदस्य नोंदणी अभियान जोरात सुरु आहे. अशातच एका सायबर चोरट्याने या अभियानाच्या नावाखाली भाजप पदाधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपशी संबंधित असल्याचा दावा करून आणि मोठ्या प्रमाणात सदस्य पुरवण्याच्या बहाण्याने पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर व्यक्तींची या आरोपीने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने सदस्य नोंदणीच्या रेफरल कोडद्वारे ही फसवणूक केली. याप्रकरणी दिल्लीतील २४ वर्षीय आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
५०० लोकांना लुबाडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरबजीत सिंग असे या अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी छत्तीसगड आणि बिहारमध्ये बसून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटी जाहिरात करण्यासाठी भाजपच्या नावाचा आणि चिन्हाचा गैरवापर केला. त्यानंतर त्यांनी ४०० ते ५०० लोकांकडून सदस्यता शुल्क घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी शिवडी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सदस्य स्वप्नील आत्माराम सावर्डेकर यांनी तक्रार दिली होती.
सदस्य देतो सांगून आर्थिक फसवणूक
१२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता घरी असताना सोशल मीडियावर स्वप्निल सावर्डेकर यांना हिंदीमधला एक व्हायरल मेसेज आला होता. त्यामध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी खासदार, आमदार, नगरसेवक अध्यक्ष किंवा अन्य पक्षातील पदाधिकारी यांना कमी किंमतीत रेफरल कोडद्वारे मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून हवी असल्यास संपर्क साधा असे म्हटलं होतं. "नमस्कार. हा मेसेज सर्वसामान्यांसाठी नाही. हा मेसेज भाजप खासदार, आमदार, नगरसेवक, उमेदवार, अध्यक्ष आणि इतर इच्छुकांसाठी उपयोगी आहे. मला आशा आहे की तुम्ही बरे असाल. जर तुम्हाला तुमच्या रेफरल कोडद्वारे वाजवी किमतीत मोठ्या प्रमाणात सदस्य हवे असतील, तर तुम्ही खालील डिटेल्सचा वापर करून आमच्याशी संपर्क साधू शकता," असं या मेसेजमध्ये म्हटलं होतं.
ज्या नंबरवरुन हा मेसेज आला होता त्या नंबरच्या व्हॉट्सअॅप प्रोफाइलमध्ये भाजपचे नाव आणि चिन्हासह "सदस्यता मोहिम सर्वेक्षण ऑनलाईन सेवा" असं लिहीलं होतं. त्यामुळे अनेकांचा त्यावर विश्वास बसला. लोकांना खोटं वाटू नये म्हणून आरोपींनी bjpsadasyata@gmail.com हा ईमेल आयडी देखील दिला होता.
दिल्लीतून आरोपीला घेतलं ताब्यात
सावर्डेकर यांनी पक्षाच्या इतर सदस्यांकडे याबाबत विचारणा केली असता हा मेसेज करणारा व्यक्ती लोकांना फसविण्यासाठी भाजपचे नाव आणि चिन्ह वापरत होता. याचा पक्षाच्या अधिकृत सदस्यता मोहिमेशी काहीही संबंध नसल्याने आणि पक्षाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब होत असल्याने सावर्डेकर यांनी मुंबई पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला असता हा मेसेज पाठवणारी व्यक्ती समरजीत सिंग असल्याचे समोर आलं. पोलिसांनी दिल्लीला जाऊन १४ फेब्रुवारीला समरजीतला अटक केली आणि मुंबईत आलं.
बिहार, छत्तीगडपर्यंत धागेदोरे
चौकशीदरम्यान सिंगने बिहारमधल्या १७ वर्षीय मुलाची माहिती दिली ज्याने त्याला चार ते पाच बँक अकाऊंट डिटेल्स दिले होते. या घोटाळ्यातून घेतलेले पैसे सिंग त्या खात्यांमध्ये जमा करायचा. पोलिसांनी बिहार पोलिसांशी संपर्क साधून त्या अल्पवयीन मुलाची माहिती मिळवली आणि त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाचा सुत्रधार हा छत्तीसगडमध्ये असल्याची माहिती अल्पवयीन मुलाने दिली. सायबर पोलीस आता छत्तीसगडमधील आरोपीचा शोध घेत आहेत.