Join us  

आक्रमक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, दोन शिक्षक रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 5:29 PM

मराठी व प्रादेशिक भाषेतील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आजतागायत 19 वर्षे होऊनही अनुदान सुरू केले नाही

ठळक मुद्देमराठी व प्रादेशिक भाषेतील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आजतागायत 19 वर्षे होऊनही अनुदान सुरू केले नाही

मुंबई - राज्यातील कायम विनाअनुदानिक शाळा कृती समितीकडून मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातीलशिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्याकडे आपला मोर्चा वळवला होता. मात्र, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक शिक्षकांपैकी 5 शिक्षकांचे शिष्टमंडळ मंत्रालयात चर्चेसाठी गेले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी या शिक्षकांचं गेल्या 21 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.  

मराठी व प्रादेशिक भाषेतील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आजतागायत 19 वर्षे होऊनही अनुदान सुरू केले नाही, त्यांना सुरू करावे. तसेच ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना २०% अनुदान सुरू केले आहे, त्यांना नियमानुसार १००% अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी शिक्षक संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. तसेच शिक्षण उपसचिव स्वाती नानल व अर्थ उपसचिव पेठकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देऊनही जाणूनबुजून उशीर केल्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावेत, अशा मागण्या असल्याची माहिती मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.

नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयावरही या शिक्षकांकडून मोर्चा काढण्यात आला आहे. येथे शिक्षकांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानात कृती समितीकडून सुरू असलेल्या आंदोलनातील शिक्षक आक्रमक झाले आहेत. सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने हे आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यामध्ये दोन आंदोलक शिक्षक जखमी झाले आहेत. शशिकांत पाटील, काशिनाथ पाटील आणि हेमंत भोसले, अशी जखमी शिक्षकांची नावे आहेत.

टॅग्स :आंदोलनमुंबईमंत्रालयशिक्षक