‘केईएम’ दुर्घटनाप्रकरणी दोषींवर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:30 AM2019-11-14T01:30:49+5:302019-11-14T01:30:59+5:30

केईएम रुग्णालयात गेल्या आठवड्यात ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत चार महिन्यांच्या मुलाला आपला हात गमावावा लागला.

The culprits will be prosecuted for 'KEM' accident | ‘केईएम’ दुर्घटनाप्रकरणी दोषींवर कारवाई होणार

‘केईएम’ दुर्घटनाप्रकरणी दोषींवर कारवाई होणार

Next

मुंबई : केईएम रुग्णालयात गेल्या आठवड्यात ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत चार महिन्यांच्या मुलाला आपला हात गमावावा लागला. या दुर्घटनेला रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची व त्या कुटुंबीयाला दहा लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी बुधवारी केली. दोषींवर कारवाई होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, भोईवाडा पोलिसांत प्रिंसच्या वडिलांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हृदयावरील उपचारासाठी प्रिंसला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन गादीलाही आग लागली. यामध्ये बाळाचा हात गंभीररीत्या भाजल्याने शस्त्रक्रिया करून हात काढून टाकावा लागला.
भाजपच्या राजश्री शिरवाडकर यांनी हा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
प्रिन्सची प्रकृती स्थिर असून, तो व्हेंटीलेटरवर असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. श्वासोच्छवास प्रक्रियेतील संसर्ग कमी करण्यासाठी आणि हृदयदोषांवर उपचार सुरू आहेत.
>सर्व रुग्णालयांच्या इलेक्ट्रिक आॅडिटची मागणी
ही घटना गंभीर असल्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या सर्व रुग्णालयांचे इलेक्ट्रिक आॅडिट करावे, अशी मागणी भापजचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. या घटनेला रुग्णालयाचे अधिष्ठाता जबाबदार असल्यामुळे त्यांचे निलंबन करण्याची मागणी सदस्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, चार दिवसांत अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: The culprits will be prosecuted for 'KEM' accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.