Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवैध मद्यविक्रीचे गुन्हे दाखल, आरोपी अटकेत, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:18 IST

अवैध मद्यविक्री प्रकरणी राज्यात गुरुवारी 22 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुंबई : अवैध मद्यविक्री प्रकरणी राज्यात गुरुवारी 22 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 124 गुन्हे नोंदविण्यात आले असून 55 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 24 मार्च ते 16 एप्रिल पर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात 2933 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये 1 हजार 198 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 169 वाहने जप्त करण्यात आली असून 7 कोटी 39 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनात राज्यव्यापी धाडसत्र सुरू आहे. अशी माहिती संचालक ( दक्षता व अंमलबजावणी) उषा वर्मा यांनी दिली.

सराईत गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 93 प्रमाणे बंधपत्र घेण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच यापुढे MPDA Act, 1981 या कायद्यातंर्गत कारवाई देखील करण्यात येईल. अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 X 7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉक डाऊन झालेला आहे. राज्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील व राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उपायुक्त तसेच संबंधित अधीक्षकांना नाकाबंदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसगुन्हेगारी