न्यू इंडिया NPA खात्याचा लेखाजोखा गुन्हे शाखेच्या हाती; प्रीती झिंटानेही घेतले होते कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:21 IST2025-03-28T10:19:30+5:302025-03-28T10:21:55+5:30
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे

न्यू इंडिया NPA खात्याचा लेखाजोखा गुन्हे शाखेच्या हाती; प्रीती झिंटानेही घेतले होते कर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: न्यू इंडिया को. ऑप. बँकेच्या १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबरोबर कर्जाची परतफेड न करता एनपीए झालेल्या खात्यांचीही चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. याच प्रकरणात बँकेने २०१० पासून एनपीए झालेल्या बँक खात्यांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेसमोर सादर केली. यामध्ये अभिनेत्री प्रीती झिंटाच्याही फाईलचा समावेश आहे. मात्र, त्यांना ७३ लाखांची सवलत देत त्यांची कर्जाची रक्कम वसूल करण्यात आल्याचे बँकेच्या माहितीतून समोर येत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. याबाबत सीईओ देवर्षी घोष यांना या माहितीसह बोलावण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनी जवळपास २०१० पासूनच्या फाईल्स आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केल्या आहेत.
प्रीती झिंटानेही घेतले होते कर्ज
प्रीती झिंटाला ७ जानेवारी २०११ मध्ये १८ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. ३१ मार्च २०१३ ला कर्जाची परतफेड न झाल्याने खाते एनपीए करण्यात आले. जवळपास ११ कोटी ४७ लाखांची रक्कम थकीत होती. ५ एप्रिल २०१४ मध्ये तडजोडीअंती ७३ लाखांची सूट देत १० कोटी ७४ लाख रुपये झिंटाकडून भरण्यात आल्याचे रेकॉर्डवरून दिसून येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या सर्व फाईल्स पुन्हा नव्याने उघडल्या जाणार असून, त्यांची फॉरेन्सिक ऑडिटरकडून पडताळणी होणार आहे. या पडताळणीत काय समोर येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.