निवृत्त ‘आयआरएस’ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा; काय काय केलं ऐकून हैराण व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:07 IST2025-09-30T10:05:12+5:302025-09-30T10:07:03+5:30
निवृत्त भारतीय महसूल सेवा अधिकारी (आयआरएस) विवेक बत्रा यांच्याविरोधात पोलिसांनी फसवणूक, बनावट दस्तऐवज, विश्वासघात आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

निवृत्त ‘आयआरएस’ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा; काय काय केलं ऐकून हैराण व्हाल!
मुंबई : निवृत्त भारतीय महसूल सेवा अधिकारी (आयआरएस) विवेक बत्रा यांच्याविरोधात पोलिसांनी फसवणूक, बनावट दस्तऐवज, विश्वासघात आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बत्रा यांच्या खासगी कंपनीतील माजी कर्मचाऱ्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली.
बत्रा, त्यांची पत्नी प्रियांका तसेच खासगी बँकेचे अधिकारी निरव ताक, राकेश शेनॉय आणि अजित कृपाशंकर मिश्रा यांनी संगनमत करून दोन बँक खाती उघडल्याचा आणि पैशांची अफरातफर केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. त्यानुसार कफ परेड पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
प्रकाश सिंग राणा (रा. नवी दिल्ली) यांच्या आरोपानुसार, २०१७ मध्ये विवेक आणि प्रियांका बत्रा यांनी त्यांना दोन कंपन्यांमध्ये संचालक म्हणून नेमले. त्यासाठी त्यांनी पीएफ खाती उघडण्याच्या बहाण्याने आधार व पॅनकार्डची प्रत घेतली. राणा यांचा आरोप आहे की, त्यांच्या नकळत या कंपन्यांच्या नावाने कुलाबा येथील बँकेच्या शाखेत करंट अकाउंट उघडण्यात आले. त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून संपूर्ण व्यवहार केला गेला. सप्टेंबर २०२४ मध्ये राणा यांनी राजीनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर विवेक बत्रा यांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबाला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पत्नी, मुलाला कोंडून ठेवले
राणा यांच्या पत्नी व मुलीला नवी दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील नोकरांच्या क्वार्टर्समध्ये बंद करून ठेवले होते, त्यामुळे त्यांनी पोलिस हेल्पलाइनला कॉल करून मदत मागितली. जुलै २०२५ मध्ये त्यांनी अधिक दस्तऐवजांसह पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. कफ परेड पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा नोंदवला. २०२३मध्ये मलबार हिल पोलिसांनी विवेक बत्रा व त्यांच्या पत्नीविरोधात आणखी एक गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा उद्योजक बिपिन अग्रवाल यांच्या तक्रारीवरून दाखल केला होता. बिपिन अग्रवाल यांनी आरोप केला होता की, विवेक बत्रा यांनी शेल कंपनी स्थापन करून ५७ लाखांची फसवणूक केली.