‘पोलिस माझ्या खिशात’ म्हणणाऱ्या गुंडावर गुन्हा; मॉडेलला तिचा मर्चंट नेव्हीतील पती सोडून गेलेला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:55 IST2025-12-27T09:55:05+5:302025-12-27T09:55:13+5:30
फिर्यादी ही कुटुंबासह मालाड पश्चिम येथे वास्तव्यास आहे. २०२३मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख अनुज सिन्हा या व्यक्तीशी झाली. तो मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनिअर असल्याची माहिती आहे.

‘पोलिस माझ्या खिशात’ म्हणणाऱ्या गुंडावर गुन्हा; मॉडेलला तिचा मर्चंट नेव्हीतील पती सोडून गेलेला...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड पश्चिम येथील एव्हरशाइन नगर परिसरात मदतीच्या भूलथापा दाखवून एका मॉडेलची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणुकीची घटना घडली आहे. आरोपीकडून पैसे परत मागितल्यावर ‘पोलिस माझ्या खिशात आहेत’, अशी दमदाटी या मॉडेलला त्याने केली होती. बांगूरनगर पोलिस ठाण्यात फसवणूक, खंडणी आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ही कुटुंबासह मालाड पश्चिम येथे वास्तव्यास आहे. २०२३मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख अनुज सिन्हा या व्यक्तीशी झाली. तो मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनिअर असल्याची माहिती आहे.
सहानुभूती दाखवत ‘त्याने’ दिले मदतीचे आश्वासन
या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी विवाह केला. मात्र, त्याने संपर्क तोडल्याने ही मॉडेल मानसिक तणावात गेली. यावेळी एन्ड्रीना पुटमॅन या तिच्या शेजारणीने तिला यापासून परावृत्त केले. शेजारणीचा पती नेवडा पुटमॅन याने सहानुभूती दाखवत मदतीचे आश्वासन देऊन ‘पोलिस व न्यायालयीन कामासाठी मोठा खर्च येतो’, असे सांगत १० लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादीच्या भावाने व कुटुंबीयांनी व्यवसायातील उत्पन्न, बचत व दागिने विकून ही रक्कम आरोपीस दिली. त्यानंतर आरोपीने आणखी रक्कम उकळली.