एसटी बँकेच्या दोन्ही गटांविराेधात गुन्हा ; हाणामारी घटनेचा नागपाडा पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 07:53 IST2025-10-17T07:53:25+5:302025-10-17T07:53:39+5:30
काही बाहेरील व्यक्तींनी सभागृहात घुसून संचालकांना मारहाण केली. नागपाडा पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

एसटी बँकेच्या दोन्ही गटांविराेधात गुन्हा ; हाणामारी घटनेचा नागपाडा पोलिसांकडून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील महाराष्ट्र राज्य परिवहन सहकारी बँकेच्या (एसटी) आढावा बैठकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटाविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपाडा पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.
एका प्रकरणात डेपो मेकॅनिक धीरज तिवारी यांच्या तक्रारीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बँकेच्या सभागृहात मासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीसंबंधी कोणतीही लेखी विषयपत्रिका वेळेवर देण्यात आली नव्हती, अशी तक्रार संचालकांनी केली. त्यामुळे ९ संचालकांनी एकत्र येत बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकडे ही बैठक अनधिकृत असल्याची लेखी तक्रार केली होती.
काही बाहेरील व्यक्तींनी सभागृहात घुसून संचालकांना मारहाण केली. तसेच संचालक मनोज धकाते यांचा मोबाइल हिसकावून फेकण्यात आला. पोलिसांनी संजय घाडगे, संगीता कळंबे, मनोज मुदलीयार, संध्या दहीफळे, श्रीहरी काळे, सुरेंद्र उके, अतुल सीतापराव यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.