क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे; हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 05:58 IST2025-01-28T05:57:54+5:302025-01-28T05:58:31+5:30

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तिचा पर्याय का देत नाहीत? असा सवाल खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना केला.

Cricket match commentary should be in Marathi only mns agitation against hotstar | क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे; हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन

क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे; हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्ने हॉटस्टारवर दाखविण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे समालोचन मराठीतून करू, लेखी आश्वासन मिळेपर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका घेत मनसे नेते अमेय खोपकर, विभागप्रमुख संतोष धुरी यांनी मनसैनिकांसह वरळी येथील हॉटस्टारच्या कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन केले.

२५ जानेवारीला भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा टी-ट्वेंटी सामना झाला. यात भारताला दोन गडी राखून विजय मिळाला. हॉटस्टारवर सामन्याचे हिंदीसह अन्य ७ भाषांमध्ये समालोचन करण्यात आले. मात्र, त्यामध्ये मराठी भाषेचा पर्याय नव्हता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तिचा पर्याय का देत नाहीत? असा सवाल खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना केला. मनसेच्या आंदोलनापुढे नमते घेत हॉटस्टारने यापुढे क्रिकेट सामन्यांचे मराठीत समालोचन दाखवले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी भांडावे लागत असेल, तर ते दुर्दैव आहे. मराठी लोकांनी समालोचन ऐकण्यासाठी मराठी भाषेचा वापर करावा, असे आवाहन खोपकर यांनी यावेळी केले.

मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा
अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक आणि अन्य मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला.  मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची नासधूस केल्याची तक्रार हॉटस्टारने केली.

Web Title: Cricket match commentary should be in Marathi only mns agitation against hotstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.