मुंबई : कोविड सेंटरच्या नावाखाली करण्यात आलेल्या गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोर्चा काढला जात आहे; मात्र जनता त्यांच्या या भूलथापांना फसणार नाही. आज काढण्यात आलेल्या मोर्चाचे ठिकाण चुकले आहे. खरा मोर्चा मातोश्री १ ते मातोश्री २ दरम्यान काढण्याची गरज होती, कारण जो काही गैरव्यवहार झाला आहे तो याच ठिकाणी झाला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केला.
समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याने संवेदनशील असल्याने भाजपने आजचा मोर्चा रद्द केला; मात्र कोणतीही संवेदना न उरलेल्या आणि केवळ राजकारण करणाऱ्यांनी मोर्चा काढला. आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
ठाण्यातील व्यवहारांची खुशाल चौकशी करा
मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी कोविड काळातील मृत व्यक्तींचे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडीबॅगसाठी सहाशे रुपयांऐवजी तब्बल साडेसहा हजार रुपये खर्च केले. आम्ही ठाण्यात तीच बॅग अवघ्या ३२५ रुपयांना घेतली. काहीजण ठाण्यातील व्यवहारांची चौकशी लावण्याची चर्चा करत आहेत; मात्र कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याने बिनधास्त चौकशी लावा, असे आव्हान शिंदे यांनी ठाकरे यांना दिले.