थोरातांच्या नाराजीवर पक्षश्रेष्ठींची शिष्टाई; मुंबईत भेट, दिल्लीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:12 IST2023-02-13T12:10:28+5:302023-02-13T12:12:01+5:30

फलित रायपूर अधिवेशनानंतर समोर येणार

Courtesy of party elites against the displeasure of the younger ones | थोरातांच्या नाराजीवर पक्षश्रेष्ठींची शिष्टाई; मुंबईत भेट, दिल्लीत चर्चा

थोरातांच्या नाराजीवर पक्षश्रेष्ठींची शिष्टाई; मुंबईत भेट, दिल्लीत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील गोंधळामुळे नाराज असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुरू केले असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी रविवारी थोरातांची मुंबईत भेट घेतली. तासभर झालेल्या या भेेटीत पाटील आणि थोरात यांच्यात सविस्तर चर्चा झाली. 

थोरात यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे या भेटीत पक्षश्रेष्ठींची भूमिका आणि थोरातांची भूमिका, तसेच थोरातांनी लिहिलेल्या पत्राबद्दल आणि त्यांनी राजीनाम्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेबाबतही गांभीर्याने चर्चा झाल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे.  राजीनाम्यासारखी  टोकाची भूमिका घेऊ नये, अशी पक्षाची भूमिका पाटील यांनी थोरातांसमोर मांडली तसेच त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे पाटील माध्यमांशी बोलतानाही म्हणाले.

थोरात एवढे व्यथित का झाले? 
nथोरात ज्या नगर जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीतील १२१ पदाधिकाऱ्यांचे निलंबन नाशिक  पदवीधर निवडणुकीतील गोंधळानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. मात्र, ही कारवाई करताना थोरातांशी चर्चाही केली नाही. 
nनिलंबित पदाधिकाऱ्यांमध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काही पदाधिकारी आहेत. त्यामुळे थोरात जास्त दुखावले गेले. थोरातांशी चर्चा न करता झालेल्या या निलंबनामुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज गेला. त्यामुळे थोरात जास्त व्यथित झाले आहेत.

Web Title: Courtesy of party elites against the displeasure of the younger ones