Join us

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना कोर्टाचे समन्स, खा. राहुल शेवाळे अब्रूनुकसानी दावा प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 12:30 IST

Uddhav Thackeray: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसान भरपाई दाव्याप्रकरणी  दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत.

मुंबई :  शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसान भरपाई दाव्याप्रकरणी  दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. न्यायालयाने दोघांनाही १४ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिकात आपल्याविषयी बदनामीकारक लेख प्रसिद्ध झाल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. पाकमधील शहर कराची आणि दुबई येथील रिअल इस्टेटमध्ये राहुल शेवाळे यांना रस होता, असा लेख दैनिकात २९ डिसेंबर २०२२च्या अंकात  प्रसिद्ध झाला. ३ जानेवारी २०२३ रोजी राहुल शेवाळे यांच्या वकील चित्रा साळुंखे यांनी नोटीस बजावली आणि माहितीच्या स्रोताविषयी दैनिकाकडे विचारणा केली. त्यावर इंटरनेटवर महिलेच्या चर्चेचा संदर्भ देण्यात आला. त्यानंतर शेवाळे यांनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल केली, तर उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानभरपाईचा दावा  दाखल केला. 

दंडाधिकारी न्यायालयाने सीआरपीसी कलम २०२ अंतर्गत ट्रॉम्बे पोलिसांना तपास करण्याचे  आदेश दिले. पोलिसांनी शेवाळेंना समन्स बजावत त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यावेळी शेवाळे यांनी संबंधित दैनिकात प्रसिद्ध झालेला मूळ लेख पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर केला. शेवाळे यांनी शिवसेनेसाठी आयुष्य वेचले आहे. रिअल इस्टेटीतील रुचीबद्दल केलेल्या दाव्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम झाल्याचा दावा साळुंखे यांनी न्यायालयात केला. साळुंखे यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने ठाकरे व राऊत यांना समन्स बजावले.

 

टॅग्स :राहुल शेवाळेउद्धव ठाकरेसंजय राऊत