सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 11:52 IST2025-10-19T11:48:09+5:302025-10-19T11:52:38+5:30
आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना न्यायालयाने वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिला

सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
IPS Rashmi Karandikar Husband Purushottam Chavan Fraud Case: मुंबईतील ७.४२ कोटी रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना एस्प्लेनेड दंडाधिकारी न्यायालयाने वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिला आहे. चव्हाण यांनी अनेक गंभीर आरोग्य समस्यांचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले. गेल्या वर्षी मे महिन्यात २६३ कोटींच्या टीडीएस घोटाळ्यातही ईडीने चव्हाण यांना अटक केली होती. फेब्रुवारीत चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दंडाधिकारी अभिजित आर. सोलापूर यांनी जामीन नाकारताना पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार होऊ शकतात असं म्हटलं
"सादर केलेली वैद्यकीय कागदपत्रे आरोपीचे आजार दर्शवत असली तरी, तो इतका गंभीर नाही की त्याला जामिनावर मुक्त करावे. असे वैद्यकीय आजार सरकारी रुग्णालये आणि तुरुंगामध्येही हाताळले जाऊ शकतात," असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.
पुरुषोत्तम चव्हाण यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, चव्हाण गेल्या १२ वर्षांपासून बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त आहेत आणि त्यांच्यात आत्महत्येची प्रवृत्ती वाढली आहे. तसेच त्यांना नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव, मानेजवळील लाळेच्या ग्रंथीला सूज आणि किडनीचा संभाव्य आजार (असल्याचे निदान झाले आहे. कारागृहातील रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत असल्याचा दावा वकिलांनी केला. या जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी पक्षाने सांगितले की, चव्हाण यांनी सरकारी कोट्यातून कमी दरात भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांकडून करोडो रुपये उकळले आहेत. चव्हाण यांचे दुबईतही व्यवसाय आहेत आणि जामीन मिळाल्यास ते पळून जाण्याची शक्यता आहे.
चव्हाण यांच्या मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना मनोविकार आणि बायपोलर डिसऑर्डरचा मुद्दा विवादास्पद आहे आणि केवळ अशा प्रमाणपत्रांवरून त्याची खात्री करता येणार नाही, असं दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं. मात्र, न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला पुरुषोत्तम चव्हाण यांना कोठडीत असताना योग्य वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, असे निर्देश दिले.
दरम्यान, दक्षिण मुंबई आणि लोअर परळसारख्या उच्चभ्रू भागांत सवलतीच्या दरात फ्लॅट्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी २४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे येथील शासकीय कोट्यातील घरे सवलतींत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत २० जणांची २४ कोटी ७८ लाख रुपयांना फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना यापूर्वी अटक केली होती. दाखल गुन्ह्यात करंदीकर यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. तपासात, करंदीकर यांच्या नावे असलेल्या बँक खात्यात दोन कोटी ६४ लाख रुपये आढळले. पुरुषोत्तम चव्हाण सध्या २६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा फसवणूक प्रकरणी ईडीच्या चौकशीमुळे दुसऱ्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.