लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांना देण्यात आलेला अंतरिम वैद्यकीय जामीन रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मुख्य जामीन याचिकेवर ९ डिसेंबर रोजी सुनावणी असल्याने न्यायालयाने त्याच दिवशी या याचिकेवर सुनावणी ठेवत असल्याचे म्हटले. तसेच याचिकादाराने केलेल्या आरोपांचे समर्थन करणारे पुरावे सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
मानखुर्द मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढत असलेल्या नवाब मलिकांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप सॅमसन पाठारे नावाच्या व्यक्तीने केला आहे. मलिकांना देण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठापुढे झाली.
मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे समर्थन करणारे पुरावे पटलावर आणले गेले नाहीत, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्याला तसे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी ठेवली.
दावे आणि प्रतिदावे
- मलिकांची अंतरिम जामिनावर सुटका करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात राहण्याची अट घातली होती. मात्र, मलिकांनी विशेष न्यायालयाची परवानगी न घेताच चार दिवस मुंबईबाहेर मुक्काम केला, असा आरोप पाठारे यांनी केला आहे. मलिक यांनी वैद्यकीय कारण देत जामीन मागितला.
- पण, जामिनावर सुटका झाल्यानंतर मलिक एकदाही रुग्णालयात दाखल झाले नाहीत. ते सतत दौऱ्यावरच आहेत आणि निवडणूक सभा घेत आहेत. तसेच, मलिक साक्षीदारांनाही धमकावत आहेत, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला.
- मात्र, मलिक यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले. विशेष न्यायालयाच्या परवानगीनंतरच मलिक यांनी मुंबईबाहेर प्रवास केला. साक्षीदारांना धमकावत असल्याबद्दल याचिकाकर्त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.