स्विमिंग पुलमध्ये केला चुकीचा स्पर्श, पीडित मुलींना आरोपीला ओळखलं, कोर्टाने दिली तीन वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:24 IST2025-09-29T14:24:10+5:302025-09-29T14:24:10+5:30
मुंबईतील कोर्टानी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली.

स्विमिंग पुलमध्ये केला चुकीचा स्पर्श, पीडित मुलींना आरोपीला ओळखलं, कोर्टाने दिली तीन वर्षांची शिक्षा
Mumbai Crime:मुंबईतील एका न्यायालयाने पाच वर्षांपूर्वी दादर येथील एका स्विमिंग पूलवर दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा गुन्हा ६ मार्च २०२० रोजी घडला होता. त्यावेळी पीडित मुलींचे वय १३ आणि १२ वर्षे होते. विशेष न्यायाधीश बी आर गारे यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. आरोपीला दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पीडित १३ वर्षीय मुलगी स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना ही धक्कादायक घटना घडली. मुलगी पोहत असताना तिला एका पुरुषाचा हात आपल्या स्विमिंग कॉस्ट्युममध्ये असल्याचे जाणवले. त्याने तिच्या खाजगी भागाला स्पर्श केला. या प्रकारानंतर मुलीने जराही वेळ न घालवता त्वरित एका महिला ट्रेनरला याची माहिती दिली. तसेच, जीवरक्षकाला देखील बोलावले. मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार, ट्रेनर आणि जीवरक्षकाने त्या व्यक्तीला त्वरित बोलावून घेतले. त्यानंतर हा विनयभंगाचा प्रकार समोर आला.
जेव्हा पीडित मुलीचे पालक तिथे आले, तेव्हा १२ वर्षांच्या दुसऱ्या मुलीनेही याच व्यक्तीकडे बोट दाखवले. तिनेही आपल्यासोबत तसाच विनयभंग झाल्याचे सांगितले. आरोपीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता, असे तिने सांगितले. या घटनेनंतर, मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ मार्च २०२० रोजी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपीचे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे प्रयत्न केला. कोर्टात आरोपीने स्वतःला निर्दोष ठरवत स्विमिंग पूलमध्ये सुमारे ३० लोक होते आणि त्या गर्दीत माझी चुकीची ओळख पटवण्यात आली असा युक्तिवाद केला. तसेच गुन्हा दाखल करायला उशीर करण्यात आला.. त्याने असाही युक्तिवाद केला की कोणतेही सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले नाही.
तरीही, न्यायालयाने आरोपीचे हे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. दोन्ही अल्पवयीन मुलींची साक्ष महत्त्वाची मानून त्याला दोषी ठरवले आणि तीन वर्षांची शिक्षा सुनावली. दोन्ही अल्पवयीन मुलांसह आठ साक्षीदारांच्या तपासणीनंतर पीडितेच्या वकिलांना आपला मुद्दा सिद्ध केला. न्यायाधीश गारे यांनी एफआयआरमध्ये एका दिवसाच्या विलंबाबद्दल तपास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण स्वीकारले. पीडित मुली रडत होत्या आणि स्वाभाविकपणे त्या घाबरल्या होत्या, ज्यामुळे गुन्हा नोंदवण्यास वेळ गेला.
आरोपीने मांडलेला चुकीची ओळख पटवण्याचा मुद्दा आणि सीसीटीव्ही नसल्याची बाजू कोर्टाने फेटाळून लावली. दोन्ही अल्पवयीन मुलींनी आरोपीला फक्त पूलवरच नाही, तर नंतर कोर्टातही ओळखले. ही ओळख महत्त्वाची ठरली. घटनास्थळी स्विमिंग पूलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेलेच नव्हते. त्यामुळे फुटेज उपलब्ध नसल्याचा आरोपीचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला नाही, असा निकाल कोर्टाने दिला.
दरम्यान, न्यायाधीश गारे यांनी दोन्ही मुलींच्या साक्ष आणि पुराव्यांवरून स्पष्ट निष्कर्ष काढला. "आरोपीचे कृत्य स्पष्टपणे दाखवते की त्याने लैंगिक हेतूने पीडितेला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि त्यानुसार त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीचे कृत्य दर्शवते की त्याने वारंवार लैंगिक हेतूने मुलीचा पाठलाग केला आणि विनयभंगाचे कृत्य केले," असं न्यायाधीश गारे यांनी म्हटलं. यामुळे आरोपीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.