एका प्रभागानतरच दुसऱ्या प्रभागाची मोजणी; निकालांचे कल स्पष्ट होण्यास विलंबाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:01 IST2026-01-15T11:00:26+5:302026-01-15T11:01:33+5:30
प्रत्येक प्रभागाची मतमोजणी क्रमवारीप्रमाणे होऊन २२७प्रभागांचा निकाल सायंकाळपर्यंत अपेक्षित

एका प्रभागानतरच दुसऱ्या प्रभागाची मोजणी; निकालांचे कल स्पष्ट होण्यास विलंबाची शक्यता
मुंबई : मतमोजणी कक्षाच्या आवारात उपलब्ध जागेनुसार मतमोजणीकरिता टेबलांची व्यवस्था होणार आहे. यात १४ टेबलावर एक प्रभागाची याप्रमाणे मतमोजणी होणार आहे. एका वेळी एका किंवा जास्तीत जास्त दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीला मुंबईत २३ किंवा ४६ प्रभागांच्या मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक प्रभागाची मतमोजणी क्रमवारीप्रमाणे होऊन २२७प्रभागांचा निकाल सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मतमोजणी नियोजन व व्यवस्थापन यासंदर्भातील निर्णय हे सर्वस्वी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा असणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, टप्प्याटप्प्याने मतमोजणी केल्यास उपलब्ध मनुष्यबळ एका वेळी कमी प्रभागांवर केंद्रित करता येईल आणि त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया अधिक जलद व सुरळीत पार पडण्यास मदत होईल. मात्र, या पद्धतीमुळे सर्व प्रभागांचे कल मतमोजणी सुरू झाल्यानंतर लगेच स्पष्ट होणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
आधी टपाली मतांची मोजणी प्रक्रिया
मतमोजणी करताना सर्वात आधी टपाली मतदानाची मतमोजणी केली जाते. बॅलेट पेपरवरील मतदानामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. टपाली मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर पहिला कल हाती येतो. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मत मोजणीला सुरुवात होते. मतमोजणीसाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहायक असतो. पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी पार पाडली जाते. मात्र, मतमोजणीची टेबल आणि प्रतिनिधी यांच्यात सुरक्षित अंतर ठेवून बॅरिकेट्स लावले जातात. ज्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे, भयमुक्त आणि देखरेखीखाली पार पाडली जाते.