Join us  

शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाची चाल; एकेकाळचा मित्रपक्ष आता नव्या भूमिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:32 PM

मुंबई महापालिकेत आता विधानसभेसारखेचं चित्र दिसणार

मुंबई: विधानसभेपाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेतही भाजपा विरोधी बाकांवर बसणार आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी याबद्दलची माहिती दिली. महापालिकेत भाजपा सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पडेल, असं कदम म्हणाले. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आधी आम्ही आमचा मित्रपक्ष शिवसेनेसोबत होतो. त्यामुळे ८३ नगरसेवक असतानाही आम्ही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला नव्हता. मात्र आता आम्ही विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहोत. मुंबई महापालिकेत आता भाजपा सक्षम विरोधी पक्षाची जबाबदारी पार पडेल, असं राम कदम यांनी माध्यमांना सांगितलं. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या सभागृहातही विधानसभेसारखंच चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबई महापालिकेत भाजपाचे ८३ नगरसेवक आहेत. तर शिवसेनेकडे अपक्षांसह ९४ नगरसेवकांचं संख्याबळ आहे. महापालिकेत काँग्रेसचे २९, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. तोच फॉर्म्युला लक्षात घेतल्यास महापालिकेत महाविकास आघाडीकडे १३२ नगरसेवकांचं संख्याबळ असेल. त्यामुळे प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी शिवसेनेला फारशा अडचणी येणार नाहीत. भाजपा विरोधी बाकांवर बसल्यानं आता विधानसभेप्रमाणेच मुंबई महापालिकेतही शिवसेना, भाजपामध्ये कलगीतुरा पाहायला मिळू शकतो. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस