Join us  

मुंबईकरांना खुशखबर...कोस्टल रोड होणार टोल फ्री; उद्धव ठाकरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 5:51 PM

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई : राजकीय वर्तुळात नेहमीच वादाचा आणि चर्चेचा विषय राहिलेल्या कोस्टल रोडचे भूमीपूजन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्य़ांना या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. कोस्टल रोड टोल फ्री असेल, अशी घोषणा ठाकरे यांनी केली. 

उद्वव ठाकरे यांनी यावेळी भाजपचे आभार मानले. मुंबईकरांच्या महत्वाच्या विकासकामासाठी आडवे न आल्याबद्दल ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे आभार मानले. कोळी बांधवांच्या मनात भीती आहे. त्यांचे काय होईल. काळजी करू नका, कोळी बांधवांच्या कोणत्यागी गोष्टीला हात लागणार नसल्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. कोणाला भकास करून विकास करायचा नाही, कोस्टल रोड टोल फ्री असेल, असे अाश्वासन ठाकरे यांनी दिले. 

पुढील चार वर्षात काम करण्यात येणार आहे. यामध्ये कंत्राटदारांनी विलंब केल्यास, वाढीव खर्च महापालिका देणार नसल्याची तंबीही ठाकरे यांनी दिली. भुलाभाई देसाई राेड, अमरसन्स उद्यान येथून कामाला सुरुवात होणार आहे.

काेस्टल राेडसाठी जागतिक स्तरावर निविदा मागविण्यात आल्या. याबाबतची नाेटीस सर्व देशांमधील दूतावासात लावण्यात आली हाेती. त्यामुळे तिथे जाणा-या महापालिकेचा पारदर्शक कारभार दिसला असेल, असा टाेला उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना लगावला.

यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला असून अनेकजण या कामाचे श्रेय लाटण्य़ाचा प्रयत्न करत होते. त्यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते. हे अच्छे दिन आले की नाही माहित नाही, अशी टीका महाडेश्वर यांनी भाजपचे नाव न घेता केली. 

 

दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पावरुन शिवसेना-मनसे आमनेसामने आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोस्टल रोडमुळे बाधित होणाऱ्या वरळीतील मच्छिमारांची भेट घेतली. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी त्यांनी यावेळी संवादही साधला. कोस्टल रोडमुळे परंपरागत मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येत असल्याच्या कारणामुळे कोळी बांधवांनी यास विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेयांनी वरळी कोळीवाड्याला भेट देऊन येथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कल्याण मेट्रो प्रकल्प भूमिपूजन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलल्याचा वचपा काढत मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने रविवारी महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावलण्यात आले आहे. दुसरीकडे, या महामार्गाचे काम आधीच सुरू झाले असल्याचे सांगत भाजपाने आता भूमिपूजनाच्या औचित्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपामुंबई महानगरपालिकाशिवसेना