Corporator's death hunger strike, mujaffar hussain critics on rulling party | नाल्याचे बांधकाम उंच करण्याचा घाट घातल्याने नगरसेवकाचे आमरण उपोषण

नाल्याचे बांधकाम उंच करण्याचा घाट घातल्याने नगरसेवकाचे आमरण उपोषण

ठळक मुद्देमीरारोडची शीतल नगर आणि शांती नगर ह्या वसाहती जुन्या असून महापालिकेने सातत्याने रस्ते व गटारांची उंची वाढवल्याने सदर इमारती सखल झाल्या आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपने शीतल नगर-शांती नगर दरम्यानच्या नाल्याचे काम गेल्या अनेक महिन्यां पासून बंद पाडल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केला आहे . तर मुद्दाम रस्त्याचा समतोल न साधता नाल्याची भिंत पुन्हा प्रमाणा पेक्षा जास्त उंच करून शीतल नगर पाण्याखाली बुडवण्याचा घाट घातलेला असल्याने त्या विरोधात स्थानिक नगरसेवक राजीव मेहरा आमरण उपोषणास बसले आहेत. तर काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी भाजपा आणि प्रशासनचा भ्रष्ट व भोंगळ कारभार शहराचे वाटोळे करत असल्याची टीका केली आहे . 

मीरारोडची शीतल नगर आणि शांती नगर ह्या वसाहती जुन्या असून महापालिकेने सातत्याने रस्ते व गटारांची उंची वाढवल्याने सदर इमारती सखल झाल्या आहेत. शिवाय जाफरी खडफी किनारा व परिसरातील सीआरझेड , कांदळवन , आदी संरक्षित परिसरात बेकायदेशीर भराव व बांधकामे झाल्याने पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग आखडले गेले आहेत . जेणे करून शीतल नगर व शांती नगर पावसात नेहमीच पाण्याखाली जाते. गेल्या अनेक वर्षांची शीतल नगरची पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी स्थानिक काँग्रेस समर्थक नगरसेवक राजीव मेहरा यांनी प्रयत्न चालवले होते . त्यावेळी पाण्याचा निचरा करणाऱ्या गटारां मध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिजच्या गोण्या आदी सापडल्या . त्या काढायला लावून पाण्याचा मार्ग मोकळा केला . तर गणपती मंदिर जवळील नाल्याचे उंची त्यांनी कमी करायला लावली. जेणे करून यंदाच्या पावसाळ्यात शीतल नगर मध्ये फारसे पाणी साचले नाही. परंतु पालिकेने सदर ठिकाणी नवीन नाल्याचे काम काढले . आधीच आवश्यकता नसताना कोट्यवधींचा खर्च काढला . ते करून पुन्हा नाला दोन फूट नाहक उंच करण्याचा घाट घातल्याने शीतल नगर पुन्हा पाण्याखाली जाईल आणि विकास आराखड्यातील रस्ता सुद्धा बंद होईल याची तक्रार मेहता यांनी चालवली . 

परंतु सत्ताधारी भाजपा कडून याला विरोध झाला. महापौर , शांती नगर भागातील भाजपा नगरसेवक आदींनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून सदरचे काम थांबवले . जेणे करून अर्धवट नाल्याचे काम तसेच असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका झाला आहे . तर पालिका प्रशासन नाल्याची उंची पुन्हा अवास्तव वाढवण्याचे काम करत असल्याने शीतल नगर पाण्याखाली जाऊन रस्ता सुद्धा बंद होणार असल्याचा आरोप करत मेहरा यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. स्थानिक रहिवाश्यांनी सुद्धा आंदोलनास पाठिंबा दिला आहे . 

पालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग कामे हाती घेताना नियम, निकष बाजूला ठेवतात. रस्त्याचे आणि गटाराचे काम हाती घेताना रस्तारेषा ठरवणे, त्या भागाचे सर्वेक्षण करणे, प्लेन टेबल आणि लेव्हल सर्व्हे, गटार, नाले, पाण्याचे प्रवाह कसे आहेत, ते कुठून वळवायचे यासाठी हायड्रॉलिक सर्व्हे, वाहनांची विद्यमान संख्या आणि भविष्यातल्या अपेक्षित वाढीचा अंदाज घेण्यासाठी ट्रॅफिक सर्व्हे, त्यानंतर इथल्या जमिनीचा पोत कसा आहे, त्यावर कोणत्या पध्दतीचा रस्ता बांधायला हवा, याची चाचणी करणारा जिऑलॉजीकल सर्व्हे करणे क्रमप्राप्त असते. मात्र, पालिकेचे अधिकारी कागदी घोडे नाचवत सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचतात असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे . 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corporator's death hunger strike, mujaffar hussain critics on rulling party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.