Coronavirus: कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू तर आई क्वारंटाईनमध्ये; ११ वर्षीय मुलाला दिला शेजाऱ्यांनी आधार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 11:25 IST2020-05-14T11:25:06+5:302020-05-14T11:25:28+5:30
१३ एप्रिल रोजी या मुलाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याचं दुख: असतानाच मुलाच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

Coronavirus: कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू तर आई क्वारंटाईनमध्ये; ११ वर्षीय मुलाला दिला शेजाऱ्यांनी आधार!
मुंबई – देशात कोरोना व्हायरसचा सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्राला बसत असल्याचं दिसून येत आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मुंबईतला आकडाही चिंतेचा विषय बनत आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली. अशीच एक दुर्दैवी गोष्ट गोरेगाव येथे राहणाऱ्या ११ वर्षाच्या मुलासोबत घडली आहे.
१३ एप्रिल रोजी या मुलाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याचं दुख: असतानाच मुलाच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आईला कांदिवली येथील रुग्णालयात क्वारंटाईन करावं लागलं. सुदैवाने या मुलाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली पण सध्या या मुलावर एकटं राहण्याची वेळ आली आहे. मुंबई मिररशी बोलताना या मुलाने सांगितलं की, त्याच्या वडिलांना १० एप्रिल रोजी घशात खवखवत खोकला येत असल्याने रुग्णालयात घेऊन गेलो. तेव्हा त्यांची कोरोना टेस्ट केल्यावर ते पॉझिटिव्ह आली त्यांनी १३ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या मुलाची जबाबदारी सध्या शेजारील दाम्पत्यांनी घेतली आहे.
शेजारील दाम्पत्य दररोज या मुलाला जेवण देतात त्याचा सांभाळ करत आहेत. या मुलाने सांगितले की, असे अनेक लोक आहेत जे कोरोनामुळे मदत करण्यासाठी पुढे येत नाही पण शेजारील काकू दर दोन तासांनी मला कॉल करुन माझी विचारपूस करत असतात असं तो म्हणाला.
ज्यावेळी रात्री हा मुलगा एकटा असतो तेव्हा बंगळुरु आणि बिहार येथील आपल्या चुलत भावांशी व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधतो. रात्रीच्या वेळी घरात एकटं असल्याने त्याला भीती वाटते, ही भीती दूर करण्याचं काम भावांकडून केले जाते. दिवसभर अभ्यास आणि टीव्ही बघून वेळ घालवतो. ४ मे रोजी या मुलाची आई क्वारंटाईनमधून परतली पण घरातील मुख्य व्यक्तीच्या जाण्याने घरावर शोककळा पसरल्यासारखं वातावरण आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट
आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!
विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
अर्थमंत्र्यांची घोषणा ५.९४ लाख कोटींची पण सरकारी खिशातून आता फक्त ५६,५०० कोटी जाणार!
...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी