Coronavirus Update : कोविड उपचारांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात १८२ कोटी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 18:04 IST2021-08-24T18:03:51+5:302021-08-24T18:04:46+5:30
Coronavirus Seven Hills Hopsital : आतापर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक रूग्णांवर करण्यात आले उपचार.

Coronavirus Update : कोविड उपचारांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात १८२ कोटी खर्च
मुंबई - कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान मुंबई महापालिकेने अंधेरी येथे सेव्हन हिल्स रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी अद्ययावत यंत्रणा तैनात ठेवली. येथील आरोग्य यंत्रणेवर मार्च २०२० ते मार्च २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १८२ कोटी ५९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रुग्णालयात मार्च २०२१ पर्यंत २५ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
मरोळ येथील सेव्हन हिल्स रूग्णालय व्यवस्थापन आणि पालिका प्रशासन येथील वादानंतर बंद झाले होते. मात्र कोविड काळात पश्चिम उपनगरातील हे रुग्णालय बाधित रुग्णांवरील उपचारांचे केंद्र बनले होते. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असताना परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी या बंद रुग्णालयाचा वापर सुरू करण्यात आला. त्यानंतर येथे नियमित उपचार सुरु करण्यात आले.
मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत पालिकेने रुग्णसेवा व प्रशासकीय खर्च मिळून ११८ कोटी ६५ लाख रुपये खर्च केले. तर जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत ६३ कोटी ९३ लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. मार्च २०२१ पर्यंत एकूण १८२ कोटी ५९ लाखांहून अधिक खर्च करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने स्थायी समितीला दिली आहे.
कोविड उपचारांसाठी ४८ तासांत रूग्णालय सुरू...
पालिकेने युद्धपातळीवर ४८ तासांत बंद रुग्णालयाची ही इमारत स्वच्छ केली. इमारतीमधील अंतर्गत यंत्रणा उभारण्यापासून ते सर्व आवश्यक साधनसामग्री, रुग्णालयातील वैद्यकीय आणि अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर हे रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झाले. येथे गंभीर संसर्ग असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
असा झाला खर्च...
मार्च ते डिसेंबर २०२० - ११८ कोटी ६५ लाख.
जानेवारी ते मार्च २०२१ - ६३ कोटी ९३ लाख.