coronavirus: कोविड योद्ध्यांना गिर्यारोहकांनी दिली अनोखी मानवंदना, ५0 व्या दिवशी चालणार ५० हजार पावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 03:45 IST2020-05-16T03:44:36+5:302020-05-16T03:45:54+5:30
वैभवने आजपर्यंत सह्याद्रीमधील अनेक गड-शिखरे, घाटवाटा पादाक्रांत केल्या आहेत, तसेच जगातील दोन खंडांतील दोन सर्वोच्च शिखरेदेखील सर करून भारताचा स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करीत विश्वविक्रम केला आहे.

coronavirus: कोविड योद्ध्यांना गिर्यारोहकांनी दिली अनोखी मानवंदना, ५0 व्या दिवशी चालणार ५० हजार पावले
मुंबई : लॉकडाउनला ५० दिवसांचा कालावधी पूर्ण होत असून काळाचौकी, मुंबई येथे राहणारा विश्वविक्रमी गिर्यारोहक वैभव ऐवळे, टाळेबंदी जाहीर झाल्यापासून रोज २१ हजार पावले आणि कमीतकमी ११ किमीचे अंतर चालायचे असा निश्चय करत, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामाजिक अंतर पाळून आणि शासनाने दिलेले सगळे नियम पाळत घराबाहेर असलेल्या सामूहिक गॅलरीमध्ये जिची लांबी फक्त १५/१८ फूट आहे, तिथे जवळजवळ ५ ते ६ तास चालत, तो दररोज बारी गावापासून महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई शिखर एवढे अंतर पार करतो. वैभवची ही अनोखी पायपीट पहाटेपासून सुरू होते. लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडू शकत नसल्याने वैभवने गॅलरीतच चालण्याची ही अनोखी शक्कल लढवली आहे. गेल्या ५० दिवसांत ५० वेळा हे शिखर सर केल्याएवढे अंतर वैभवने गॅलरीतच चालून पार केले असून, लॉकडाउनच्या ५० व्या दिवशी ५० हजार पावले चालून तो कोविड योद्ध्यांना अनोखी मानवंदना देणार आहे.
वैभवने आजपर्यंत सह्याद्रीमधील अनेक गड-शिखरे, घाटवाटा पादाक्रांत केल्या आहेत, तसेच जगातील दोन खंडांतील दोन सर्वोच्च शिखरेदेखील सर करून भारताचा स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करीत विश्वविक्रम केला आहे. या वर्षी आॅस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याची तयारी चालू असताना कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाणे अशक्यच होणार असल्याचे हा गिर्यारोहक सांगतो. मात्र, पुढे काहीतरी वेगळी मोहीम नक्कीच आखेन, दृढ निश्चय केला तर कोणत्याही परिस्थितीत आपण आपले लक्ष्य गाठू शकतो, असा ठाम विश्वास त्याला आहे. लॉकडाउनबद्दल बोलताना हा गिर्यारोहक सांगतो, सध्याच्या कोविड १९ आजारातून बरे होऊन बाहेर येणे म्हणजे आपला दुसरा जन्मच आहे. कोणतेही औषध नसताना हा जन्म आपण बघतोय तर तो केवळ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे. त्याचप्रमाणे आपल्याला याचा संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र झटणारे पोलीस, सफाई कामगार आणि सगळेच जे अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत, या कठीण परिस्थितीत आपले वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवत देशासाठी, समाजासाठी कार्य करीत आहेत, त्या या वीरांच्या भूमीत जन्मलेल्या सर्व वीरांना, सर्वस्व पणाला लावून मोठ्या जिद्दीने लढा देणाºया सर्वच कोविड योद्ध्यांना मी लॉकडाउनचा तिसरा टप्पा व ५० दिवसांचा कालावधी पूर्ण होताना ५० हजार पावले चालून मानवंदना देणार आहे.
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट
शिखर - कळसूबाई
कळसूबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर एवढी आहे, तर पायथ्याजवळील बारी गावापासून याची उंची ९०० मीटर आहे. कळसूबाई शिखर चढण्यासाठी जवळजवळ पाच ते साडेपाच तास लागतात.