CoronaVirus : मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, इतर कर्मचारीही क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:47 IST2020-04-20T21:46:49+5:302020-04-20T21:47:25+5:30
CoronaVirus : कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात मुंबई महापालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष महत्त्वाचे कार्य करीत आहे.

CoronaVirus : मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, इतर कर्मचारीही क्वारंटाईन
मुंबई : कोरोनाचा (कोविड-१९) संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या कार्यात समन्वयाची महत्त्वाची भूमिका बजावणारा मुंबई महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्षच कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. या कक्षातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील अन्य कर्मचाऱ्यांनाही तिथेच क्वारंटाईन करण्यात आले आहेत. मात्र, मुख्य नियंत्रण कक्ष आवश्यक मनुष्यबळसह सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात मुंबई महापालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष महत्त्वाचे कार्य करीत आहे. मुंबईवर ओढवणाऱ्या प्रत्येक आपत्ती काळात या कक्षाच्या माध्यमातून मदत कार्य पोहोचविण्यात आले आहे. केंद्र व राज्यातील महत्वाच्या व्यक्तींशी थेट संपर्क साधण्यासाठी या कक्षात हॉट लाईन आहेत. तसेच संपूर्ण मुंबईतील घडामोडींवर या नियंत्रण कक्षातून नजर ठेवण्यात येत असते. अशा या महत्त्वाच्या खात्यातील दोन कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सोमवारी खळबळ उडाली. मात्र, या दोन कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले आहे.
खबरदारी म्हणून पालिका मुख्यालयाची जुनी व विस्तारित इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. परंतु, नियंत्रण कक्ष महत्त्वाचा असल्याने अद्याप सील करण्यात आलेला नाही. याउलट कर्मचाऱ्यांची दोन गटांमध्ये विभागणी करून एक गट कक्षाच्या बॅक अप नियंत्रण कक्षात सुरू ठेवण्यात आला आहे.