Coronavirus : जहाजांवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटन व्यवसाय गाळात, टुरिस्ट गाइड आर्थिक अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 00:03 IST2020-03-16T00:02:12+5:302020-03-16T00:03:12+5:30
जहाजांसाठी व इतरत्र टुरिस्ट गाइड म्हणून काम करणाऱ्यांना याच कालावधीत अधिक मागणी असते. मात्र आता त्यांच्यासमोर वर्षभराच्या आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहण्याची भीती आहे.

Coronavirus : जहाजांवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटन व्यवसाय गाळात, टुरिस्ट गाइड आर्थिक अडचणीत
- खलील गिरकर
मुंबई : कोरोनोच्या वाढत्या प्रभावामुळे देशात जहाजांच्या प्रवेशावर बंदी असल्यामुळे त्याचा फटका देशातील पर्यटन व्यवसायाला बसत आहे. परिणामी, जहाजांमधील परकीय नागरिकांशी संवाद साधण्यासाठी असलेल्या टुरिस्ट गाइडना आर्थिक अरिष्टाला सामोरे जावे लागत आहे.
विदेशातून येणाऱ्या जहाजांना ३१ मार्चपर्यंत भारतात प्रवेशबंदी लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानुसार गेल्या शनिवारी विदेशी जहाजाला मंगळुरू बंदरात प्रवेश नाकारून पुन्हा मस्कतला पाठविण्यात आले होते. त्याचा फटका त्या जहाजावर अवलंबून विविध सेवा पुरविणा-या व्यक्तींना बसला. या जहाजामध्ये मोठ्या संख्येने इटलीचे पर्यटक असल्याने इटलीची भाषा जाणणा-या गाइडसोबत करार केला होता. या गाइडचेही आर्थिक नुकसान झाले. ३१ मार्चपर्यंत मुंबई बंदरात येणाºया १० जहाजांचे आगमन रद्द झाल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी स्पष्ट केले होते.
जहाजांसाठी व इतरत्र टुरिस्ट गाइड म्हणून काम करणाऱ्यांना याच कालावधीत अधिक मागणी असते. मात्र आता त्यांच्यासमोर वर्षभराच्या आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहण्याची भीती आहे. इटालीयन भाषेची जाणकार व केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या अधिकृत टुरिस्ट गाइड म्हणून काम करणाºया नसीम सय्यद म्हणाल्या, ‘आम्हाला या हंगामासाठी अनेक ठिकाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र, सर्व आरक्षण सध्या रद्द करण्यात आले आहे. ही परिस्थिती कधी सुधारणार, याकडे लक्ष लागले आहे. लवकर परिस्थिती पूर्वपदावर यावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.
विविध जहाजांच्या आगमनाचे समन्वय करणारे राजन नायडू म्हणाले, मंगळुरू बंदरातून परत पाठविलेल्या जहाजामुळे त्यावर अवलंबून असलेल्या विविध घटकांचे सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ते कसे भरून काढायचे, हा प्रश्न आहे.
पर्यटन कालावधीतच कोरोनाची साथ
जहाज परदेश दौ-यावर निघण्यापूर्र्वी ज्याबंदरांत जाणार असेल, तेथील टुर आॅपरेटर, हॉटेल व्यावसायिक अशा घटकांसोबत वर्षभरापूर्वी आरक्षण करावे लागते. मात्र, आता कोरोनामुळे भारतातील व्हिसा रद्द केल्याने व जहाजांना प्रवेशबंदी करण्यात आल्याने जहाज पर्यटनाला आर्थिक फटका बसत आहे. जहाज पर्यटनासाठी जानेवारी ते मे हा कालावधी अधिक चांगला समजतात. मात्र, याच काळात कोरोनाच्या साथीमुळे उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.