Coronavirus : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ संभाव्य कोरोना रुग्ण आढळल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 20:03 IST2020-04-06T20:02:32+5:302020-04-06T20:03:15+5:30
मातोश्री बंगल्याच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चेने सोमवारी खळबळ उडविली.

Coronavirus : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ संभाव्य कोरोना रुग्ण आढळल्यानं खळबळ
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. वांद्रे येथील ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चेने सोमवारी खळबळ उडविली. त्या चहा विक्रेत्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून तो रस्ता बंद करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
वांद्रे येथील कलानगरमध्ये उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान आहे. या बंगल्याच्या मागच्या बाजूस साहित्य सहवासाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक चहाची टपरी आहे. या चहा विक्रेत्याला सर्दी व कफचा त्रास होत होता. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांनी टपरी बंद ठेवली होती. त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कोरोनाबाबतच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
त्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही. अहवाल आल्यावरच त्याला कोरोनाची लागण झाली का? हे स्पष्ट होणार आहे. मात्र या विभागात मुख्यमंत्री राहत असल्याने हा रस्ता बंद करून निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले. तातडीने या ठिकाणी औषध आणि धूर फवारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.